लोकसभेची पुनरावृत्ती होणार? सांगलीमधून ‘या’ काँग्रेस नेत्याने निवडणूक लढण्याची केली घोषणा

सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही सांगलीच्या जागेवरून मविआमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. कारण महाविकासआघाडीतल्या जागावाटपाआधीच काँग्रेस नेत्याने थेट निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
काय म्हणाल्या जयश्री पाटील ?
काँग्रेसकडे आपण सांगलीच्या विधानसभेची उमेदवारी मागणार असल्याचं जयश्री पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जयश्री पाटील यांनी जाहीर केलं आहे.जयश्री पाटील या वसंदादा घराण्यातील सून असून स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आहेत.
लोकसभेत विशाल पाटील यांना दिला पाठिंबा
लोकसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटील यांनी अपक्ष उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांचा उघडपणे प्रचार केला होता. आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. तसंच विशाल पाटीलही आपल्या पाठीशी असल्याचा दावा जयश्री पाटील यांनी केला आहे. या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचा विजय झाला होता. यानंतर आता विधानसभेतदेखील मविआमध्ये सांगलीच्या जागेवरून चांगलीच जुंपणार आहे.





