काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार; महादेव जानकरांचा हल्लाबोल

Mahadev Jankar | राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत काढलेल्या मोर्चामध्ये महादेव जानकर देखील सहभागी झाले होते.
नेमकं काय म्हणाले महादेव जानकर?
“बच्चू कडू यांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी मी दिल्लीवरून आलो आहे. मेंढपाळांनी आणखी किती दिवस केवळ मेंढरेच राखायची? मेंढपाळांच्या मुलांसाठी अजूनही वसतिगृह सुरू झाले नाही. कॅबिनेट मंत्री असताना योजना आणल्या. या योजनांची घोषणा झाली मात्र निधी दिला गेला नाही. देशात १९ टक्के धनगर समाज असताना एकही खासदार, आमदार नाही. आयएएस, आयपीएस नाही. कारण काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार आहे,” अशी टीका जानकर यांनी केली आहे.
“गद्दारांच्या मागे उभे राहू नका. प्रहार व राष्ट्रीय समाज पक्ष शेतकरी व मेंढपाळ यांच्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा देणार आहे. अमरावतीचा मोर्चा ही याची सुरुवात आहे. पुणे, औरंगाबादलाही मोर्चा काढू. मी मंत्री असताना धनगर मुलांसाठी होस्टेल काढले. मतदान करताना विचार करून करा. ही तर सुरुवात आहे. हे मी सरकारला सांगतो. आम्ही दोघेही फकीर आहोत”, असंही महादेव जानकर म्हणाले.
बच्चू कडू यांचा इशारा
यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. मेंढपाळ त्यांचे मेंढरे चारू शकत नाही. त्यामुळे त्यांनी जगायचे तरी कसे, असा सवाल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि गायब झाले. आता त्यावर बोलायला तयार नाहीत. आता आम्ही थांबणार नाही. गिरता वहीं है जो रुकते है. लेकीन हम रुकनेवाले नहीं. ये तो ट्रेलर हैं. पिक्चर अभी बाकी है”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
यावेळी आमदार बच्चू कडू यांनी देखील भूमिका मांडली. “दिव्यांगांना चार महिन्यापासून मानधन मिळाले नाही. मते मिळावी म्हणून मेहनत न करता पैसे मिळणारी योजना सुरू केल्या. अजित पवार म्हणायचे 5 तारखेपर्यंत जर दिव्यांग बांधवाला मानधन मिळालं नाही तर सचिवांचा पगार होणार नाही. दादा आता कहा गया आपका वादा?”, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
हेही वाचा:
इस्रोच्या प्रमुखपदी व्ही.नारायणन यांची निवड ; 14 जानेवारीला पदभार स्वीकारणार





