काँग्रेस हा बेईमान व भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वर्धा – काँग्रेसने आमच्या आस्था, श्रद्धा आणि संस्कृतीचा नेहमीच अपमान केला आहे. या काँग्रेसवाल्यांनी तर कर्नाटकमध्ये आपल्या गणपती बाप्पाला थेट तुरुंगात टाकले होते, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच काँग्रेसने नेहमीच अर्बन नक्षलवादाचे समर्थन केले आहे. काँग्रेस हा बेईमान व भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष असल्याचीही टीका त्यांनी केली.
वर्धा दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अनेक विकसकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नरेंद्र मोदी म्हणाले, तुकडे-तुकडे गँगचे लोक व शहरी नक्षलवादी मिळून काँग्रेस पक्ष चालवत आहेत. कॉंग्रेस हा देशातील सर्वात अप्रामाणिक व भ्रष्ट पक्ष आहे.
काँग्रेसचा शाही परिवार देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणून ओळखला जातो. काँग्रेसने आजवर आपली संस्कृती आपल्या आस्थेचा कधीच सन्मान केला नाही. त्यांनी जर आपल्या संस्कृतीचा, आस्थेचा सन्मान केला असता तर त्यांनी गणेशोत्सवाचा, गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध केला नसता. हे लोक गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध करतात.
काँग्रेसने दुर्लक्षित केलेल्या विश्वकर्मा कारागिरांना आमच्या सरकारने प्राधान्य दिले आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक कारागिरांना नवीन मशिनरी आणि कर्जपुरवठा करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले आहे. पण काँग्रेसचे सरकार असताना स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही या पक्षाने एससी, एसटी आणि ओबीसीतील लोकांना मागेच ठेवले. त्यांनी या समाजातील लोकांना पुढे जाऊ दिले नाही, असे टीकास्त्र डागले आहे.
“आता भारताचे 21 वे शतक आहे. मोदी हे देशाचे कर्णधार असून दहा वर्षांत 10 कोटी महिला आत्मनिर्भर झाल्या. अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू करण्यात येत असून त्यासाठी महिलांना 25 लाखाचे अर्थसहाय्य मिळणार आहे. देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य माणसाचा सन्मान वाढवण्याचे काम करत असून त्यांची ताकदही वाढवत आहे.”
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री





