Congress : हरियाणातील पीछेहाटीचा ठपका इव्हीएमवरच; कॉंग्रेसचा अंतरिम अहवाल

चंदिगढ : हरियाणात अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या हाती पीछेहाट आली. पक्षाच्या सत्यशोधन समितीने त्या पीछेहाटीचा ठपका प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी (इव्हीएम) संबंधित विसंगतींवर ठेवला आहे. हरियाणाच्या सत्तेत कमबॅक करण्याचा प्रचंड विश्वास कॉंग्रेसला वाटत होता. प्रत्यक्षात कामगिरी उंचावून भाजपने सलग तिसऱ्यांदा त्या राज्याची सत्ता काबीज केली.
विधानसभेच्या एकूण ९० पैकी ४८ जागा भाजपने जिंकल्या. तर, कॉंग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसने हरियाणातील पीछेहाटीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी ज्येष्ठ नेते करणसिंह दलाल यांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यीय समिती स्थापन केली. त्या समितीने जारी केलेल्या अंतरिम अहवालाविषयीची माहिती दलाल यांनी दिली.
हरियाणातील वातावरण कॉंग्रेससाठी अनुकूल होते. निवडणुकीआधीच्या प्रत्येक सर्वेक्षणाने पक्षाला कौल दिला होता. प्रत्यक्षात निकाल त्याउलट आले, असे म्हणत त्यांनी इव्हीएमशी संबंधित विसंगती, मतदानाच्या आकडेवारीतील तफावत, निवडणूक आयोगाशी निगडीत पारदर्शकतेचा अभाव याबाबींवर बोट ठेवले. भाजपने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला.
इव्हीएम बॅटरींचे प्रमाणापेक्षा अधिक चार्जिंग हा मुद्दा आहेच. त्याशिवाय, मतांमध्ये तफावत आढळून आली. मतदानाच्या दिवशी (५ ऑक्टोबर) सायंकाळी ७ वाजता निवडणूक आयोगाने ६१.१९ टक्के मतदान झाल्याचे म्हटले. त्या रात्री ११.४५ वाजता ती आकडेवारी ६५.६५ टक्के इतकी नमूद करण्यात आली. त्यानंतर ७ ऑक्टोबरला अंतिम आकडेवारी जारी करण्यात आली.
त्यानुसार, ६७.९० टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले. प्रारंभी निवडणूक आयोगाने मतदारसंघनिहाय आकडेवारी न देता जिल्हानिहाय आकडेवारी दिली, याकडे दलाल यांनी लक्ष वेधले.





