आयकर प्रकरणात काँग्रेसला मोठा दिलासा; कारवाई थांबवली

Congress Income Tax Notice Case Update: – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने कॉंग्रेस पक्षाला सुमारे ३५०० कोटी रुपयांच्या टॅक्स वसुलीची नोटीस जारी केली होती. त्यावर कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी आयकर विभागाने काँग्रेसविरोधात कोणतीही जबरदस्ती कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने आयटी विभागाचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचे म्हणणे नोंदवले. या प्रकरणाचा अंतिम निकाल येईपर्यंत प्रचलित परिस्थितीत कॉंग्रेसवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सुनावणीच्या सुरुवातीलाच मेहता म्हणाले, की मला या प्रकरणी विधान करायचे आहे. काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे आणि निवडणुका सुरू असल्याने आम्ही या पक्षावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही.
काँग्रेसतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी या आयकर विभगाच्या या दातृत्वाचे कौतुक केले आणि त्यांनी आता दयाळू भूमिका घेतली आहे, असे त्यांनी उपरोधिकपणे नमूद केले. आयकर विभागाने ताज्या नोटीससह, कॉंग्रेस पक्षाकडून एकूण ३५६७ कोटी रुपयांची मागणी केली आहे, असे त्यात म्हटले आहे.





