MP : कॉंग्रेसच्या पोस्टरबाजीला ‘फोनपे’चा आक्षेप; कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

भोपाळ – मध्य प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, पोस्टर बाजी रंगली आहे. यावरून पैशांची देवाणघेवाण करणारी कंपनी “फोनपे’ने कॉंग्रेसला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
मध्य प्रदेश कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्याविरोधात भोपाळमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली होती. या पोस्टरवर क्यू-आर स्कॅनर लावण्यात आले होते. तसेच, कमलनाथ यांना “भ्रष्टाचार नाथ’ आणि “फरार’ असे संबोधले होते.
यानंतर त्याच दिवशी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्याविरोधात कॉंग्रेसने भोपाळमध्ये पोस्टरबाजी केली. या पोस्टरवर “फोनपे’च्या लोगोसह क्यू-आर स्कॅनमध्ये शिवराज सिंह चौहान यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यावर लिहिलेले की, “50 टक्के कमिशन द्या आणि तुमचं काम करा.’
कॉंग्रेसने केलेल्या या पोस्टरबाजीवर “फोनपे’ने आक्षेप घेत कारवाईचा इशारा दिला आहे. ट्वीट करत फोनपे’ने म्हटले की, अनधिकृत पद्धतीने “फोनपे’ लोगोचा वापर करण्यात आला आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे. आमच्या कंपनीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. त्यामुळे मध्य प्रदेश कॉंग्रसने लावलेले पोस्टर काढून टाकावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.





