कॉंग्रेसला सोबत घ्यावेच लागेल; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत

पुणे : देशात सत्ताधाऱ्यांना पर्याय उभा करण्यासाठी आघाडी करायची असेल तर कॉंग्रेसला सोबत घ्यावेच लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. त्याचवेळी त्यांनी दिल्लीतील बैठक ही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात होती, असे स्पष्ट करून विरोधकांचे संघटन करणे ही आमची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट करत तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाची पाहणी केली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, तिसऱ्या आघाडीबाबत माध्यमातूनच चर्चा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनात राजकीय पक्षांना बाजूला ठेऊन आपले प्रश्न मांडले जातात, त्यामुळे आम्हालाही हा एक महत्त्वाचा प्रश्न वाटला. त्याच समर्थन कशा प्रकारे करता येईल, या आंदोलनाबाबत तसेच मागण्याबांबत केंद्राकडे सूचना करण्यासाठी श्वेतपत्रिका काढता येईल का? याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झालीच नाही. मात्र, देशात पर्यायी आघाडी करायची झाल्यास कॉंग्रेसला सोबत घ्यावेच लागेल अशी आपली भूमिका आहे. तसेच याबाबत आपण सर्व संबधितांशी चर्चा करून ही बाब मांडली आहे.
तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्व शरद पवारांकडे असेल का याबाबत बोलताना, शरद पवारांनी असे उद्योग अनेक वर्ष केले आहेत.मात्र, भाजप विरोधात चेहरा कोण यावर अद्याप चर्चा झालेली नाही. या आघाडीचे सामूहिक नेतृत्व असावे ही सगळयांची भूमिका असून सध्या पर्याय म्हणून उभे राहणाऱ्यांना शक्ती देणे आणि त्यांचे संघटन मजबूत ठेवणे हाच उद्देश असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
ईडी म्हणजे सूड उगवण्याचा पॅटर्न
अनिल देशमुख यांच्या चौकशीबाबत बोलताना पवार म्हणाले की, शासकीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सूड उगवण्याचा नवा पॅटर्न सुरू झाला आहे. यंत्रणांचा वापर निराशेतून होतोय. केंद्राकडून सत्तेचा गैरवापर होतोय. या गोष्टी आम्हाला काही नव्या नाहीत. ईडीच्या तपासणीत फारसे काही हाती लागले नाही. त्यामुळे आम्हाला देशमुख यांच्या चौकशीची चिंता नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.





