काँग्रेसची गॅरंटी मोदींसारखी फसवी नाही; मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची टीका

पुणे – कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश येथील काँग्रेस सरकारने गॅरंटी खरी करून दाखवली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, तरुणांना रोजगार, महिलांना मोफत बसप्रवास, शेतकरी आणि गरिबांना मोफत वीज, ५०० रुपयांत सिलिंडर या योजना काँग्रेसने खऱ्या करून दाखवल्या आहेत. काँग्रेसची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखी फसवी नाही, अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेस काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद, शहराध्यक्ष अरविंद शिदे आदी उपस्थित होते. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू, दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार, गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घर अशा घोषणा केल्या. यातील एकही योजना व्यवस्थित राबवली नाही.
२ कोटी नोकऱ्यांबाबत संसदेत विचारणा झाल्यानंतर ७ लाख तरुणांना नोकरी दिल्याची कबुली सरकारने दिली आहे. हे प्रमाण एक टक्काही नाही. शेतकऱ्यांना हमीभाव नाही. भाजप सरकारमुळे शेतकरी दिल्लीत शहीद झाले. महाराष्ट्र सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी, गरीब, बेरोजगारांसाठी या सरकारकडे एकही कल्याणकारी योजना नाही, असा टोलाही रेड्डी यांनी लगावला.
निवडणूक जिंकण्यासाठी भाजप देशाला तोडत आहे. विकासाचे मुद्दे नसल्याने हिंदू- मुस्लिम आणि हिंदू -ख्रिश्चन यांच्यात फूट पाडून धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत. भाजपने महाराष्ट्राला गद्दारांचा अड्डा केला आहे. दोन पक्ष फोडून नेत्यांना गुलाम केले आहे. गुजरातसाठी मुंबई लुटण्याचे काम सुरू आहे. दोन माणसं जिंकणार, की महाराष्ट्रातील १२ कोटी लोक जिंकणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे, असेही रेड्डी या वेळी म्हणाले.





