UP: काँग्रेस नेत्याने ‘सपा’ उमेदवारीविरोधात दाखल केला अर्ज, सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

प्रयागराज – उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याची सोमवारी कॉंग्रेसने हकालपट्टी केली. इंडिया आघाडीतील एकजूट कायम असल्याची ग्वाही देण्यासाठी ती कारवाई करण्यात आल्याचे समजते. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या ९ रिक्त जागा भरण्यासाठी १३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. त्या पोटनिवडणुकीतून माघार घेत कॉंग्रेसने सर्व जागांवर इंडिया आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पक्षाला (सप) पाठिंबा जाहीर केला.
मात्र, फुलपूर मतदारसंघातून कॉंग्रेसचे नेते सुरेश यादव यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आता त्यांच्यावर पक्षशिस्तीच्या भंगाबद्दल कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम यादव यांच्यावर झालेला नाही. ते अपक्ष म्हणून लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मतदारसंघातील जनता पाठिशी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याने भाजपचे नेते प्रवीण पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे फुलपूरची जागा रिक्त झाली. आता त्या मतदारसंघात इंडिया आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याने भाजपसाठी स्थिती अनुकूल बनल्याचे तूर्त तरी मानले जात आहे.





