Congress news : दिल्लीत होणार कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होणार

Congress news : कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी देशाची राजधानी दिल्लीत होणार आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्या बैठकीचे महत्व वाढले आहे.
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांच्यासह प्रमुख नेते बैठकीत सहभागी होतील. त्यामध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार ते तातडीने समजू शकलेले नाही.
मात्र, सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनात केंद्र सरकारला घेरण्यासाठीच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होऊ शकते. नुकतेच महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. झारखंडमध्ये झामुमो, कॉंग्रेस, राजदचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीने सत्ता राखली.
मात्र, महाराष्ट्रात कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. महाराष्ट्रात कॉंग्रेसची आजवरची नीचांकी कामगिरी नोंदली गेली. त्या निकालांचा विचार करून पक्षाच्या कामगिरीबद्दल बैठकीत चर्चा होण्याची चिन्हे आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या ३ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्या निवडणुकीच्या तयारीचा मुद्दाही बैठकीवेळी चर्चेला येऊ शकतो.





