हरियाणा निवडणुकीत काँग्रेस – सपा – आप युतीची शक्यता संपली

नवी दिल्ली: काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 89 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत आणि युतीचा भाग म्हणून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सवादी (सीपीआय-एम) ला एक जागा दिली आहे. 90 सदस्यीय हरियाणा विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्षाने 89 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केल्यामुळे, आम आदमी पार्टी (आप) आणि समाजवादी पक्ष यांच्याशी युती होण्याची शक्यता आता संपली आहे.
काँग्रेसने 90 पैकी 89 जागांवर उभे केले उमेदवार –
हरियाणात काँग्रेस 89 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर एक जागा माकपला सोडण्यात आली. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेसने बुधवारी रात्री उशिरा 40 उमेदवार जाहीर केले. त्यानंतर गुरुवारी त्यांनी पहाटे दोन आणि दुपारी एक अशा पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यांनी यापूर्वी 41 उमेदवारांची घोषणा केली होती.
सीपीआय(एम) भिवानीची जागा लढवणार, सपाला जागा मिळाली नाही –
काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या मते, पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने (CEC) भिवानी विधानसभेची जागा सीपीआय(एम) ला देण्याचा निर्णय घेतला आहे. सोहना विधानसभेची जागा समाजवादी पक्षाच्या (एसपी) वाट्याला जाण्याची शक्यता यापूर्वी वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने गुरुवारी येथून रोहताश खटाना यांना उमेदवारी जाहीर केली.
आम आदमी पक्षाशीही चर्चा फिस्कटली –
हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत जागावाटपाची चर्चा केली होती, ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कोंडी झाली होती. हरियाणातील काही काँग्रेस नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षासोबत युती करण्यावर आक्षेप व्यक्त केला होता. केजरीवाल यांच्या पक्षानेही 89 उमेदवारांची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता युतीची शक्यता संपुष्टात आली आहे.
सुरजेवाला यांच्या मुलालाही तिकीट-
काँग्रेसने आपल्या पाचव्या यादीत उकलाना (राखीव)मधून नरेश सेलवाल आणि नारनौडमधून जसबीर सिंग यांची नावे जाहीर केली. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांचा मुलगा आदित्य सुरजेवाला यांना कैथलमधून तिकीट देण्यात आले आहे. सुरजेवाला यांचा मुलगा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुरजेवाला कैथलमधून निवडणूक हरले होते.
या नेत्यांनाही संधी मिळाली –
काँग्रेसने पंचकुलामधून माजी उपमुख्यमंत्री चंद्र मोहन, हिस्सारमधून राम निवास रारा, बावानी खेडामधून प्रदीप नरवाल, अंबाला शहरातून निर्मल सिंग, एलेनाबादमधून भरत सिंग बेनिवाल आणि आदमपूरमधून चंद्र प्रकाश यांना उमेदवारी दिली आहे. फरीदाबादमधून लखन कुमार सिंगला, बल्लभगडमधून पराग शर्मा, फतेहाबादमधून बलवान सिंग दौलतपुरिया आणि हातीनमधून मोहम्मद इस्रायल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे.





