काँग्रेसला ट्रिब्यूनलकडून मोठा धक्का; 199 कोटींच्या देणगीवर कर भरणा करावा लागणार

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला आयकर अपील न्यायाधिकरणाकडून (आयटीएटी) मोठा झटका बसला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षातील करसवलतीच्या प्रकरणात काँग्रेसची अपील फेटाळण्यात आली असून, पक्षाला देणगी म्हणून मिळालेल्या १९९ कोटी रुपये रकमेवर आता आयकर भरावा लागणार आहे. आयकर विभागाकडून कोणतीही सूट न मिळाल्याने काँग्रेससाठी हा मोठा आर्थिक फटका मानला जात आहे.
काँग्रेस पक्षाला १९९ कोटी रुपये देणगीच्या स्वरूपात प्राप्त झाले होते. या रकमेवर आयकर विभागाने कर भरण्याची नोटीस बजावली होती. याला काँग्रेसने विरोध करताना ही रक्कम देणगी म्हणून प्राप्त झाल्याने ती करमुक्त असल्याचा दावा केला होता. पक्षाने आयकर विभागाच्या या कृतीला चुकीचे ठरवले होते. राजकीय पक्षांना देणगीच्या रकमेवर कर लागू होत नाही, असा युक्तिवाद करत काँग्रेसने कर विवरणपत्रच दाखल केले नव्हते.
मात्र, आयकर विभागाने देणगीच्या रकमेवर कर आकारणीचा निर्णय कायम ठेवला, आणि आता ट्रिब्यूनलनेही हा निर्णय योग्य ठरवला आहे. परिणामी, काँग्रेसला १९९ कोटी रुपये देणगीवर लागू होणारा आयकर भरावा लागणार आहे. या निर्णयामुळे काँग्रेस पक्षासमोर आर्थिक आव्हान निर्माण झाले आहे.





