Congress : मतचोरीपासून लक्ष विचलित करण्यासाठी विधेयके पुढे आणली; काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : सध्या मतचोरीचा विषय गाजत आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांनी मजबूत उमेदवार दिला आहे. भारत-अमेरिका संबंधांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा मोदी सरकारचा इरादा आहे. त्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना हटवण्याशी संबंधित विधेयके पुढे करण्यात आली, असा शाब्दिक हल्लाबोल कॉंग्रेसने केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संबंधित विधेयके लोकसभेत सादर केली. मात्र, ती विधेयके घटनाबाह्य आणि लोकशाहीविरोधी आहेत. भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी कृती वॉशिंग मशीनप्रमाणे कार्य करण्यापुरत्या मर्यादित आहेत, अशी उपरोधिक प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली. ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.
गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आरोपांवरून ३० दिवस अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्र्यांना पदांवरून पायउतार व्हावे लागेल. तशी तरतूद संबंधित विधेयकांमध्ये आहे. त्याकडे लक्ष वेधून रमेश म्हणाले, आरोप झाल्यानंतर ३० दिवसांत भाजपमध्ये प्रवेश न केल्यास पदावरून हटवले जाईल. भाजपमध्ये ३० दिवसांत प्रवेश केल्यास वॉशिंग मशीनचे कार्य सुरू होईल.





