Congress – BJP : कॉंग्रेसचा हिंदूविरोधी चेहरा उघड; भाजपची जहरी टीका

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भगवान श्रीरामांचा उल्लेख पौराणिक व्यक्तिमत्व म्हणून केल्यावरून भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली. राहुल यांनी कॉंग्रेसचा हिंदूविरोधी चेहरा उघड केला, असे त्या पक्षाने म्हटले.
कॉंग्रेसने आपल्या नावात बदल करून हिंदूविरोधी कॉंग्रेस असे ठेवावे. कॉंग्रेस मुस्लिमांचा पक्ष असल्याचे राहुल यांनी याआधी म्हटले होते. त्या पक्षाने हिंदू दहशतवादासारखा शब्दप्रयोग केला. कॉंग्रेसने कधीच भगवान श्रीरामांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला नाही. तसेच, अयोध्येत राम मंदिराची उभारणी होऊ नये यासाठी शक्य ते प्रयत्न केले, असे टीकास्त्र भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोडले. जगभरातील अब्जावधी हिंदूंच्या श्रद्धेची खिल्ली उडवणे कॉंग्रेसने थांबवावे, असे भाजपचे नेते अमित मालवीय यांनी म्हटले.
शीखविरोधी दंगलींविषयी केलेल्या भाष्यावरूनही भाजपने राहुल यांच्यावर पलटवार केला. शीखविरोधी दंगली म्हणजे चूक असल्याचे राहुल यांना वाटत असेल; तर त्यांनी चूक दुरूस्त करावी. त्यांनी जगदीश टायटलर, कमल नाथ या नेत्यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करावी. दंगलींबाबत याआधी बोलताना सॅम पित्रोदा यांनी जे घडले ते घडले असे म्हटले होते. त्यावरून त्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते आर.पी.सिंग यांनी दिली.





