नवी दिल्ली – सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा स्वीकारत कॉंग्रेसने गुरूवारी देशभरात निदर्शने केली. अदानी समुहाशी संबंधित त्या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) करण्याची आग्रही भूमिकाही पक्षाने निदर्शनांवेळी मांडली. हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने नुकताच एक अहवाल जाहीर केला. त्यामध्ये बुच आणि त्यांच्या पतीचे अदानी समुहाशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला. त्याचा आधार घेऊन कॉंग्रेसने देशभरात विविध ठिकाणी निदर्शने केली. निदर्शनांचा भाग म्हणून ईडीच्या कार्यालयांसमोरही धरणे आंदोलन करण्यात आले. संबंधित प्रकरणी पारदर्शक चौकशी होणे गरजेचे असल्याचे कॉंग्रेसने म्हटले. कुठली अयोग्य कृती झाली नसल्यास जेपीसीमार्फत चौकशी का नाकारली जात आहे, असा सवाल त्या पक्षाकडून करण्यात आला. बुच दाम्पत्याने याआधीच हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आमचे आर्थिक व्यवहार पारदर्शक स्वरूपाची असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. अदानी समुहानेही केवळ बदनामीसाठी आरोप करण्यात आल्याचे म्हटले आहे.