पुणे | उमेदवारीच्या प्रतीक्षेने इच्छुकांची घालमेल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाविकास आघाडीकडून पुण्यातील उमेदवारांची नावे अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत. तर, भाजप- महायुतीनेही फक्त तीन उमेदवार फायनल केले. त्यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे. यावर सर्वच इच्छुकांनी अर्ज घेऊन ठेवले असून, आता ते यादीच्या प्रतीक्षेत आहेत.
शहरात आठ विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. तर, महायुतीत भाजपकडे सहा आणि राष्ट्रवादीकडे दोन जागा असण्याची शक्यता आहे. त्यात भाजपकडून पर्वती, शिवाजीनगर आणि कोथरूड मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत.
तर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि खडकवासला मतदरसंघातील जागांची नावे मागे ठेवली आहेत. तर महायुतीत राष्ट्रवादी काॅग्रेस अजित पवार गटाकडे असलेल्या हडपसर आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात यादी जाहीर झालेली नसली, तरी त्यांनी संभाव्य उमेदवारांना एबी फाॅर्म दिल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीत पुण्यातील कोणत्या जागा कोणाकडे असणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. आघाडीत शिवसेनेने चार, काॅंग्रेसने पाच, तर राष्ट्रवादीनेही पाच जागांची मागणी केलेली आहे.
त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे सांगण्यात येत असल, तरी प्रत्यक्षात उमेदवार जाहीर झाल्यानंतरच कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार हे स्पष्ट होणार आहे. पुण्यात शिवसेनेकडे सुमारे २० जण इच्छुक आहेत.
तर काॅंग्रेसकडे ९१ जणांनी तिकिटांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीकडे पुण्यात ४६ जणांनी मुलाखत दिली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीकडे ८ जागांवर दीडशे जण इच्छुक असल्याने सर्वांचीच घालमेल सुरू आहे.
मनसेची सावध भूमिका
मनसेकडून पुण्यात आठही विधानसभांची तयारी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले असले तरी मनसेकडे पाच विधानसभांमध्ये उमेदवार आहेत. तर मनसे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नाराजांशीही संपर्कात आहे.
त्यामुळे मनसेकडूनही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यातच पुण्यातील भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ऐन निवडणूकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने पुण्यात मनसेची भूमिका नक्की काय? हे यादी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.





