Nagar | नेवासा बसस्थानक व आगारामध्ये सावळागोंधळ

नेवासा, (प्रतिनिधी) – नेवासा बसस्थानक व आगारामध्ये सध्या कोणाचा कोणावर ताळमेळ राहत नसल्यामुळे मोठा अनागोंदी कारभार सुरू झालेला असून आगार व्यवस्थापनेतील सावळ्यागोंधळामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ आलेली आहे. यात सुधारणा करण्याची मागणी नेवासा शहर भाजपाच्यावतीने करण्यात आली आहे.
बसस्थानकामध्ये रात्री नऊ वाजेनंतर वाहतूक नियंत्रक बसस्थानकात राहत नाही. सुरक्षारक्षक रात्रीच्यावेळी रहात नसल्यामुळे अनेकदा चोरीच्या घटना घडत आहे. वेगवेगळ्या कारणांनी शिर्डी – संभाजीनगर या बसेस बऱ्याच वेळ आगारामध्येच थांबत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. बसस्थानक व परिसरामध्ये अस्वच्छता पसरलेली आहे. महिलांना प्रसाधनगृह वापरण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे.
नेवासा आगारातील बहुतांश बसेस जुनाट असल्यामुळे नेहमी बंद पडण्याच्या घटनांत वाढ झालेली असून, टायर फुटण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे नेवासा आगाराला नवीन बसेस पुरवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली एसटी अशी बिरुदावली टिकून राज्यभर फिरणाऱ्या लालपरीच्या कारभारात सुधारणा करण्याची मागणी शहर भाजपाच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनावर भाजपाचे युवानेते मनोज पारखे,ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विलास बोरुडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे, नीलेश शेंडे, महेश आरले, गणेश गायके,राजेश कडू आदींच्या सह्या आहेत.





