बीड : आका आणि त्यांच्या गँगचा माज अजून संपलेला नाही.अशोक मोहिते प्रकरणातील आरोपी हे कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. आमदार धस पुढे म्हणाले की, दोन महिने झाले तरी कृष्णा आंधळे फरार आहे. तर अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत ते कर्नाटकमध्ये पकडले आहेत. अशोक मोहितेच्या मुलाची तब्बेत नाजूक आहे. त्यामुळे आरोपींवर 307 चा गुन्हा दाखल करावा म्हणजे हे आतमध्ये जातील. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला आपल्या कुटुंबाप्रती कोणतीही आस्था नाही. तो करुन करुन काय करणार? कारण त्याचा इतिहासच तसा आहे. त्याला कुणाविषयीही प्रेम नाही. तो निघाला की कुठेही एकटाच निघतो. तसा तो गेलेला आहे. पण जाऊन जाऊन कुठे जाणार? पोलिस व सीआयडी तपासाच्या बाहेर तो जाऊच शकत नाही, असेही ते म्हणाले. धनंजय देशमुख यांचा त्रागा रास्त आहे. मी त्यांच्या व महादेव मुंडे यांच्या कुटुंबासोबत आहे. माझे डीवायएसपींशी बोलणे झाले आहे. त्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. याशिवाय एसपींनी त्यांना एलसीबीचेही काही सहकारी तपासासाठी दिलेत. महादेव मुंडे यांचे मारेकरीही लवकर सापडले पाहिजेत. त्याच्या मुलाच्या डोळ्यातील पाणी पाहून माझा प्रचंड संताप होत आहे. त्यामु्ळे त्याला न्याय मिळणे गरजेचे आहे, असेही धस म्हणाले.