ओझर (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यातील अनेक गावांत व रस्त्यालगत अनेक छोटी मोठी हॉटेल्स व ढाबे विनापरवाना चालत आहेत. अशा हॉटेल व ढाब्यांमधील अन्न खाऊन विषबाधा झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यासाठी येथील पदार्थांची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे. जुन्नर तालुक्यात मोठी लोकसंख्या असणारी अनेक गावे असून यातील बरीचशी गावे महामार्गालगत व मुख्यमार्गालगत आहेत. यामुळेच हॉटेल व ढाबा व्यवसाय चालू झाले आहेत. हा व्यवसाय चालू करण्यासाठी अन्न-औषध प्रशासन विभागाकडून परवाना घेणे आवश्यक असते. परंतु याची पर्वा न करता हे व्यवसाय राजरोसपणे चालू असल्याचे दिसून येते. यातील काही हॉटेल व ढाबा व्यावसायिकांकडे परवाना आहे. मात्र, तो परवाना नूतनीकरण न केल्याचे दिसते. बहुंताश हॉटेल व ढाब्यांवर कमालीची अस्वच्छता असून शिळे अन्न दिले जात असल्याची प्रवासी वर्गाची तक्रार आहे. येथील पाणी पिण्यायोग्य आहे का नाही? याबाबतही संभ्रम आहे. सगळीकडे पावसाळी दिवस चालू असून याच दिवसात मलेरिया, कावीळ, टॉयफॉईड, डायरिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव असतो. ज्या जागेत व्यवसाय करायचा, अशी जागा बिनशेती असावी असा नियम आहे. मात्र बरेचशी हॉटेल्स व ढाबे बिनशेती नसलेल्या जागेतच चालू आहेत. त्यामुळे सरकारचा महसूल बुडत आहे. तहसीलदार कार्यालयामार्फत अशा जागेत चालणाऱ्या व्यवसायांची तपासणी होणे आवश्यक आहे. अन्न-औषध प्रशासन विभागामार्फत विना परवाना चालणाऱ्या हॉटल्स व ढाब्यांमधील अन्नाची व पाण्याची तपासणी होणे आवश्यक आहे. प्रामुख्याने एस.टी स्थानकात असणाऱ्या कॅन्टीनमध्ये तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.