केशवनगरकडे पुणे पालिकेचे दुर्लक्ष; निवारण न करताच तक्रार “क्लोज’

मांजरी, दि. 1 (प्रतिनिधी) – केशवनगर-मुंढवा येथील लोणकर वस्ती येथे अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. खड्डे म्हणण्यापेक्षा रस्त्यांचे तळे झाले आहे. महापालिका प्रशासन मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत आहे. या रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले. परंतु, प्रवाशांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. रस्त्याची अवस्था थोड्याच दिवसांत पुन्हा जैसे थे होऊन प्रवाशांच्या वाट्याला चिखलमय वाट आली आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्याचे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करावा, अशी मागणी केली जात आहे.
ऑनलाइन तक्रार परस्पर क्लोज?
केशवनगर-मुंढवा येथील लोणकरवस्ती येथील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यासंदर्भात महापालिकेकडे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या फोटोसह ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात येथे काम न करताच ही ऑनलाइन तक्रार क्लोज करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाच्या या अजब कारभाराचा नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.
जयंत जाधव





