Pimpri Chinchwad Power Cut : चिंचवडकरांना महावितरणचा ‘करंट’! भर उन्हात तासनतास बत्ती गुल; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
Pimpri Chinchwad Power Cut : चिंचवडमधील तानाजी नगर आणि केशवनगर भागात शनिवारी सलग तीन तास वीज पुरवठा खंडित; लहान मुले आणि ज्येष्ठांचे प्रचंड हाल.

Pimpri Chinchwad Power Cut – पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे महावितरणच्या नाकर्तेपणामुळे नागरिक यातना भोगाव्या लागत आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चिंचवड गावठाण, तानाजी नगर आणि केशवनगर परिसरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. भर उन्हात वीज गायब झाल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ‘वर्क फ्रॉम होम‘ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल झाले.
मात्र, या गंभीर समस्येकडे महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नेमका बिघाड कोठे झाला आहे आणि वीज कधी येणार, याची माहिती घेण्यासाठी त्रस्त नागरिकांनी चिंचवड महावितरणच्या ७८७५७१५०६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र, नेहमीप्रमाणे येथील कर्मचाऱ्यांनी फोन चक्क बाजूला काढून ठेवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तक्रार ऐकून घेण्याऐवजी नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी कठोर कारवाई करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, कामाचा खोळंबा
दुपारच्या वेळी तापमान वाढलेले असताना अचानक वीज गेल्याने नागरिक घामाघूम झाले. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांचे मोबाइल आणि लॅपटॉप डिस्चार्ज झाल्याने संपर्क तुटला, तर घरून काम करणाऱ्या नोकरदारांचे महत्त्वाचे ‘लॉगिन’ बंद पडले. कार्यालयांमधील एसी आणि पंखे बंद झाल्याने कर्मचारी हैराण झाले होते. सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत या भागातील वीज गायब असल्याने संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण होते.
देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली ‘अंधाधुंदी’ कारभार
दरवर्षी उन्हाळ्यात देखभाल-दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्या छाटण्याचे कारण पुढे करून महावितरणकडून वीज खंडित केली जाते. मात्र, याची पूर्वसूचना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात महावितरण सपशेल अपयशी ठरली आहे. प्रत्यक्षात स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्वसूचना दिल्यास नागरिकांना किमान मानसिक तयारी तरी करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने चिंचवडच्या या भागातील नागरिकांचा संयम आता सुटत चालला असून, जर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत, तर महावितरणच्या कार्यालयावर जनआंदोलनाचा ‘शॉक’ देण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.






