भाजप आणि बजरंग दलाला “आयएसआय’कडून पैसे मिळत असल्याचा आरोप
नवी दिल्ली: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अणि कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजप आणि बजरंग दलाची बदनामी केल्याबद्दल दिल्ली न्यायालयात बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घ्यावी की नाही याचा निर्णय 9 ऑक्टोबर रोजी करण्याचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी निश्चित केले आहे.
भाजप आणि बजरंग दल पाकिस्तानची गुप्तचर संस्था “आयएसआय’ कडून पैसे घेत आहेत, असा आरोप दिग्विजय सिंग यांनी 31 ऑगस्ट रोजी केला होता. सिंह यांनी आपल्या या वक्तव्याद्वारे भाजपा, भाजपाचे नेते आणि जनतेला मोठ्या प्रमाणात दुखावण्यासाठी गंभीर आरोप केले गेले, असे भाजपचे सदस्य राजेश कुमार यांनी या तक्रारीत म्हटले आहे. दिग्विजय सिंह यांनी कोणत्याही विश्वसनीय स्रोत किंवा पुरावा उपलब्ध करुन दिला नाही, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
दिग्विजय सिंह यांना वादग्रस्त वक्तव्ये करण्याची सवयच आहे. कोणताही आधार न घेता वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा त्यांचा इतिहास आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे.