Shivendra Raje Bhosale: शिवेंद्रसिंहराजेंच्या बदनामीप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
Shivendra Raje Bhosale जिल्ह्यातील एका यूट्यूब चॅनेलवरुन छायाचित्रांमध्ये फेरफार करून ती चुकीच्या संदर्भाने समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Shivendra Raje Bhosale: सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मॉर्फ करून त्याचा संबंध साताऱ्यातील एका नृत्य कार्यक्रमाशी जोडल्याचा आरोप करत मंगळवारी राजे समर्थक आक्रमक झाले. संबंधित छायाचित्रे आणि कार्यक्रमाचा प्रत्यक्षात कोणताही संबंध नसल्याचा दावा करत या प्रकाराविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एका यूट्यूब चॅनेलवरुन छायाचित्रांमध्ये फेरफार करून ती चुकीच्या संदर्भाने समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामागे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची राजकीय व सामाजिक बदनामी करण्याचा उद्देश असल्याचा आरोप राजे समर्थकांनी केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
नगराध्यक्ष अमोल मोहिते, भाजपचे गटनेते अविनाश कदम यांच्यासह शिवेंद्रसिंहराजे समर्थकांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित यूट्यूब चॅनेलच्या संपादकाविरोधात कारवाईची मागणी केली. यावेळी अविनाश कदम यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील स्थान, छत्रपती घराण्याचा वारसा आणि विकासकामांबाबतची भूमिका सर्वश्रुत असल्याचे त्यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने छायाचित्रे तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.





