Satara: कुठे पाणीटंचाईच्या झळा तर कुठे पाणी रस्त्यावर; पालिकेच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह
Satara शहरातील काही भागांत पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने टँकरच्या फेर्या वाढल्या आहेत. दिवसाला एका टँकरच्या 15 ते 16 खेपा होत असल्याने आतापासूनच पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळा अद्याप पूर्णपणे सुरू होण्याआधीच ही परिस्थिती असेल, तर आगामी काळात नागरिकांना किती गंभीर संकटाला सामोरे जावे लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Satara: सातारा शहरात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. एकीकडे पाणीबचतीचे आवाहन, घंटागाडीच्या फेर्यांमध्ये घट आणि काटकसरीने पाणी वापरण्याच्या सूचना; तर दुसरीकडे शहरातील अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे. केसरकर पेठ, करंजे, शनिवार पेठेचा काही भाग, गोल मारुती मंदिर परिसर आणि सदर बाजारातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, पाणी वाचविण्याच्या उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पालिकेच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील काही भागांत पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने टँकरच्या फेर्या वाढल्या आहेत. दिवसाला एका टँकरच्या 15 ते 16 खेपा होत असल्याने आतापासूनच पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळा अद्याप पूर्णपणे सुरू होण्याआधीच ही परिस्थिती असेल, तर आगामी काळात नागरिकांना किती गंभीर संकटाला सामोरे जावे लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
बाराशे रुपयांना पाणी!
पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने अपार्टमेंटमध्ये राहणार्या नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. एका टँकरसाठी सुमारे बाराशे रुपये मोजावे लागत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. पिण्याच्या पाण्यापासून दैनंदिन वापरापर्यंत प्रत्येक गरजेसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत असतील, तर पालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा उपयोग काय, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिकेने पाणीबचतीचे आवाहन करण्यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष गळती रोखणे, विस्कळीत पुरवठा सुरळीत करणे आणि टंचाईग्रस्त भागांसाठी नियोजनबद्ध पर्यायी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. अन्यथा कागदावरील उपाययोजना आणि प्रत्यक्षातील पाण्याचे संकट यांतील दरी अधिकच रुंदावणार आहे.
उपाययोजना कागदावर नकोत, ठोस भूमिका हवी
सातार्यात नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असताना रस्त्यावर वाहणारे पाणी रोखण्याची जबाबदारी कोणाची? पाणीबचतीच्या घोषणा करण्यापेक्षा गळती रोखण्यासाठी पालिका प्रत्यक्षात काय करते, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. टंचाईग्रस्त भागांची यादी जाहीर करून पुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करावे. आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था करावी आणि पाणीगळतीच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. नागरिकांनी काटकसर करायची आणि प्रशासनाने केवळ आवाहने करायची, हे किती दिवस चालणार? पाणीबचतीचा खरा कस घोषणांमध्ये नव्हे, तर नागरिकांच्या नळाला वेळेवर पाणी मिळण्यात आहे!





