अजय देवगनसह चित्रपट निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल, Thank God चे रिलीज अडचणीत ?

मुंबई – अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतच आहे. आता पुन्हा एकदा चित्रपट धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चित्रपट निर्माते इंद्र कुमार आणि ‘थँक गॉड’च्या कलाकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त समोर आले आहे.
कायस्थ समाजाच्या सदस्यांनी राजस्थानमध्ये या चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप यावेळी तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती समोर आणली आहे.वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार कायस्थ समाजाच्या प्रतिनिधींनी चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध हिंदू देवता चित्रगुप्तचे अश्लील चित्रण केल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली कायस्थ समाजाच्या प्रतिनिधींनी याबाबतचा आपला आक्षेप नोंदवल्याचे समजते.
चित्रपटामध्ये चित्रगुप्तच्या अवतीभोवती अर्धनग्न अवस्थेत महिला उभ्या केलेल्या पाहायला मिळत आहेत यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते म्हणून थँक गॉड’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकावीत आणि मग तो प्रदर्शित करावी अशी मागणी तक्रारदारांनी केल्याचे समजते. थँक गॉड’ हा चित्रपट 24 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. मात्र, त्याचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर त्याचा बहिष्कार सुरू झाला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीन आठवडे उरले असताना चित्रपट निर्माते यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.





