Rahul Gandhi : “गोव्यात जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण केला जातोय”; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर गोव्यात जाणीवपूर्वक जातीय तणाव भडकावल्याचा आरोप केला आहे. मात्र असे प्रकार सहजासहजी होऊ दिले जाणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.
रविवारी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी टिप्पणी केली की गोव्याचे आकर्षण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात आणि तेथील लोकांच्या वैविध्यपूर्ण आणि सामंजस्यपूर्ण स्नेह आणि आदरातिथ्यात आहे .
दुर्दैवाने, भाजपच्या राजवटीत या सलोख्यावर आक्रमण होत आहे.भाजप जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करत आहे. संघ परिवाराकडून अशाच प्रकारची कृती संपूर्ण भारतात होत आहे व त्याला भाजपच्या सर्वोच्च स्तरांचा पाठिंबा आहे.
गोव्यात, भाजपची रणनीती स्पष्ट आहे: पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागांचे शोषण करताना लोकांमध्ये फूट पाडणे आणि हरित भूमीचे अवैध रूपांतर करून आणि पर्यावरणीय नियमांना बगल देऊन गोव्याच्या नैसर्गिक आणि सामाजिक वारशावर हल्ला करणे.
गोव्यातील आणि संपूर्ण भारतातील लोक या फुटीरतावादी अजेंडाकडे पाहत असून त्याविरूध्द एकजुटीने उभे आहेत असे राहुल गांधी म्हणाले.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अर्थात आरएसएसच्या गोवा युनिटचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी गोव्याचे संरक्षक संत सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केल्यानंतर वाद निर्माण झाला.
एका इंग्रजी माध्यमाच्या वृत्तानुसार, वेलिंगकर यांनी संतांच्या गोएंचो सायब (गोव्याचे संरक्षक) या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील ख्रिश्चन समुदायामध्ये नाराजी पसरल्याने अनेक तक्रारी आणि निषेध करण्यात आले आहेत.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल केलेल्या टिप्पण्यांबद्दल वेलिंगकर यांच्याविरोधात रविवारी जुन्या गोव्यात स्थानिक आणि राजकीय नेत्यांनी निदर्शने केली असताना राहुल गांधींचे वक्तव्य आले आहे.
आंदोलक सकाळी जमले आणि त्यांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले आणि सेंट फ्रान्सिस झेवियरचे दशवार्षिक प्रदर्शन पूर्ण होईपर्यंत वेलिंगकर यांना हद्दपार करण्याची मागणी केली, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली.
हे प्रदर्शन नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. संताबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर वेलिंगकर यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून बिचोलिम पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
याबाबत आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर म्हणाले, राज्यातील शांतता आणि सौहार्द भंग होऊ देऊ नका. आम्ही युगानुयुगे शांततेत जगलो आहोत आणि ते नष्ट होऊ नये.
आंदोलकांसोबत सत्ताधारी पक्षाचा (भाजप) एकही आमदार का उपस्थित नव्हता, असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारने असे प्रश्न जबाबदारीने हाताळण्याची मागणी केली.
तृणमूल काँग्रेस गोवा सह-संयोजक सामील व्होल्वोईकर यांनीही अधोरेखित केले की सर्व धर्माचे लोक सेंट फ्रान्सिस झेवियरचा आदर करतात आणि वेलिंगकरांच्या टिप्पण्यांमुळे राज्यात अनावश्यक समस्या निर्माण होतात.





