Commonwealth Games 2030 : भारताला दुसऱ्यांदा मिळाले राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद, २०३० मध्ये ‘या’ शहरात होणार आयोजन

India host Commonwealth Games 2030 : भारतीय क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारताला 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (कॉमनवेल्थ गेम्स) यजमानपदाचा मान मिळाला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर ही ऐतिहासिक घोषणा केली. त्यांनी याला देशासाठी अभिमान आणि सन्मानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. भारत दुसऱ्यांदा या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी 2010 मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले होते, ज्याने भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळवून दिली होती.
परराष्ट्रमंत्र्यांनी दिली माहिती –
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन अहमदाबाद येथे होणार आहे. त्यांनी लिहिले की, हा केवळ भारतासाठीच नव्हे, तर गुजरातसाठीही अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनामुळे आणि भारताला जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा व प्रतिभांचे केंद्र बनवण्याच्या संकल्पामुळे हे शक्य झाले आहे. जयशंकर यांनी हे देखील नमूद केले की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हे भारतासाठी ऑलिम्पिकच्या यजमानपदाच्या दिशेने एक मजबूत पाऊल ठरेल.
The Commonwealth Association’s approval for India to host the 2030 Commonwealth Games in Ahmedabad is a proud moment for Bharat and Gujarat.
It is a testament to PM @narendramodi’s vision of world-class infrastructure and nurturing sporting talent.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 16, 2025
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद –
या प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, हा गुजरात आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कार्यकारी मंडळाने 2030 च्या स्पर्धेसाठी अहमदाबादला प्रस्तावित यजमान शहर म्हणून निवडले आहे, जे राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा आणि वाढत्या क्षमतांचा पुरावा आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे आणि भारताला जागतिक क्रीडा उत्कृष्टतेच्या दिशेने नेण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे कौतुक केले.
हेही वाचा – AUS W vs BAN W : अॅलिसा हीलीचे सलग दुसरे शतक! ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर १० विकेट्सनी दणदणीत विजय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा इतिहास –
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात 1930 मध्ये कॅनडातील हॅमिल्टन शहरात झाली होती. त्यावेळी ती स्पर्धा ‘ब्रिटिश एम्पायर गेम्स’ म्हणून ओळखली जात होती. विशेष म्हणजे, पहिल्या स्पर्धेत ब्रिटिश भारताने भाग घेतला नव्हता. भारताने 1934 मध्ये लंडन येथे आयोजित दुसऱ्या स्पर्धेत प्रथमच सहभाग नोंदवला होता. 2030 मधील आगामी स्पर्धा या क्रीडा आयोजनाच्या शताब्दी वर्षाचे प्रतीक असेल.
हेही वाचा – Ranji Trophy 2025 : केरळच्या टॉप ऑर्डरला महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा झटका! ३५ धावांवर गमावल्या ३ विकेट्स
2026 मध्ये ग्लासगो येथे स्पर्धा –
माहितीनुसार, 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणार आहे, जिथे 74 देशांतील 3,000 हून अधिक खेळाडू सहभागी होतील. त्यानंतर 2030 मध्ये अहमदाबाद क्रीडा विश्वाचे केंद्र बनेल. या आयोजनामुळे भारताची क्रीडा प्रतिष्ठा अधिक दृढ होईल, तसेच देशाच्या पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील साख नवी उंची गाठेल.





