अल्पसंख्याकांच्या विकासासाठी कटिबद्ध : खासदार इम्रान प्रतापगढी

पुणे – राजकारणात पक्षनिष्ठा, सर्व जाती- धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक असलेले रमेशदादांसारखे कणखर व्यक्तिमत्त्व आवश्यक आहे. कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी आणि येथील सामाजिक व धार्मिक सलोखा टिकविण्यासाठी रमेश बागवे यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी बुधवारी केले.
तुम्ही रमेशदादांना आमदार करून विधानसभेत पाठवा, आम्ही त्यांना मंत्री करू. कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी निधी कमी पडला, तर मी माझ्या खासदार निधीतून मदत करेन; पण कॅन्टोन्मेंटचा विकास आता थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. बागवे यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक विभागाचे चर्चासत्र कॅम्पमधील टाउन प्लाझा येथे आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राजस्थानचे माजी मंत्री आणि अजमेर दर्ग्याचे अध्यक्ष आमीन पठाण, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, मौलाना निजामुद्दीन चिश्ती, डॉ. मौलाना काझमी, अली इनामदार, शफी इनामदार, जावेद शेख, भोलासिंग अरोरा, फादर रॉड्रिक्स, कविराज संघेलिया, विनोद मथुरावाला, प्रसाद केदारी, नरुद्दीन अली सोमजी, सलीम शेख, चंद्रशेखर धावडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यघटना बदलण्यासाठी अब की बार चारसो पार, हा नारा देणाऱ्या लोकांना देशातील जनतेने २४० जागांवर आणले. जग अबोल लोकांचा इतिहास वाचत नाही. आपल्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराबद्दल आवाज उठविण्याची गरज आहे. महाराष्ट्राची अस्मिता वाचविण्यासाठी गुजरातच्या रिमोटवर चालणारे सरकार हद्दपार करण्याची गरज आहे, अशी टीकाही प्रतापगढी यांनी केली.





