लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; 9 लाख नवीन व्हीव्हीपॅट मशिन्सची करणार निर्मिती

नवी दिल्ली – 2024च्या लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाकडून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 8.92 लाख नवीन व्हीव्हीपॅट मशिन्सची निर्मिमी सुरू करण्यात आली आहे. तसेच 2.71 लाख एम-2 मॉडेल मशीन्स बाद करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आयोगाने पुढील लोकसभा निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशिन्सचे पुनरावलोकन करून अप्रचलित एम-2 प्रकारची मशीन मतदान प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. तसेच नवीन व्हीव्हीपॅट मशिन अपग्रेड करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
व्हीव्हीपॅटमधील दोषांबाबत प्रसारमाध्यमांच्या अहवालाचा संदर्भ देत सांगण्यात आले की, 3.43 लाख व्हीव्हीपॅट मशिन्स प्रतिबंधात्मक देखभालीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. सदोष व्हीव्हीपॅट कोणत्याही प्रकारे चुकीचा निकाल देत नाही. परंतु केवळ मतदान प्रक्रियेदरम्यान कामकाज थांबवण्याचे सूचित करते, असा दावाही करण्यात आला आहे.
दरम्यान, 2019च्या लोकसभा निवडणुकीत देशभरातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमच 17.4 लाख व्हीव्हीपॅट मशिन्सचा वापर करण्यात आला होता. या मतदान प्रक्रियेनंतर तांत्रिक तज्ज्ञ समितीने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यासमवेत संपूर्ण विश्लेषण केले होते.





