पिंपरी | व्हीव्हीपॅट मशीनबाबत जनजागृती

कार्ला, (वार्ताहर) – ज्या उमेदवाराला मतदान केले त्याला ते मिळाले की नाही, याची माहिती मिळणे हा मतदाराचा हक्क आहे. ही माहिती व्हीव्हीपॅट मशीनद्वारे कशी समजून घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून गावोगावी मोबाइल व्हॅन फिरविण्यात येत आहे.
मावळ तालुक्यात कार्ला येथे तालुका प्रशासनाच्या मदतीने नागरीकांमध्ये व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती करण्यात आली.
इव्हीएम मशीनद्वारे निवडणूका घेत असताना, त्याबद्दलच्या सर्व शंका दूर करण्याचे प्रयत्न निवडणूक आयोगाने सुरू केले आहेत. यामुळे मतमोजणीवर घेतले जाणारे आक्षेप कमी होणार आहेत.
व्हीव्हीपॅट मशीन ही पारदर्शक प्रणाली असून, यातून मतदाराने निवडणूकीत कुणाला मतदान केले हे समजणार आहे. तसेच मतमोजणीवर वाद निर्माण झाल्यास निवडणूक आयोगाला व्हीव्हीपॅट पावत्यांच्या मदतीने निकाल निश्चित करणे शक्य होणार आहे.
प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी आशा धायगुडे, सरपंच दीपाली हुलावळे, तलाठी दीपक धनवडे, अर्जुन चव्हाण ,सुप्रिया कावरे, शुभम मावकर यांनी व्हीव्हीपॅट मशिनची सविस्तर महिती नागरिकांना दिली.
मतदाराला आपण कोणाला मतदान केले, तसेच ज्या उमेदवाराला मतदान केले ते चिन्ह आणि चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसते. निवडणूक आयोगाच्या या प्रात्याक्षिक मोहिमेमुळे मतदार राजा आनंदी होत आहे. आशा धायगुडे, मंडल अधिकारी, कार्ला





