पुणे, – मागील महिनाभरापासून राज्यात सुरू असलेली विधानसभेची रणधुमाळी संपली असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील आदर्श आचारसंहिता मागे घेतली असल्याचे पत्र जारी केले आहे. त्यामुळे आता पुणे शहरासह ग्रामीण भागातील विकासकामांना गती येणार आहे. यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष होते. सुरुवातीस मार्च महिन्यात देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. जूनमध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आचारसंहित हटविण्यात आली. त्यानंतर विकासकामे सुरू झाली. आता ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नव्याने विकास निधी दिला जाऊ नये, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले नसेल, अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्यात यावे, तथापि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झाले असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असे स्पष्ट केले होते. शनिवारी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता समाप्त होत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मागील एक महिन्यांपासून नवीन विकासकामे आहे त्या टप्प्यावर थांबली होती. ती पुन्हा आता सुरू होणार आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विकासकामांना निधी देण्यात येतो. राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल, यासाठी विकासकामे मंजूर करण्यावर आॉगस्ट – सप्टेंबर महिन्यात राजकीय नेत्यांनी पुढाकार घेत. आपापल्या मतदारसंघात विविधकामे मंजूर करून घेतली. यामध्ये काही कामांची वर्क आॉर्डर देण्यात आली. ती कामे सुरू करण्यात आली. मात्र, काही कामे आचारसंहितेमध्ये अडकली. आता या कामांची वर्कऑर्डर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.