आरोग्य अधिकाऱ्यांची प्रशासकीय उजळणी ! आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक

पुणे, दि. 9 – आरोग्य विभाग त्याच्या सर्व भागधारकांशी प्रभावी समन्वयाने काम करेल. लोककेंद्रित आरोग्य सेवा, डेटा आधारित निर्णय घेणे आणि सक्षमकर्ता म्हणून माहिती तंत्रज्ञानचा वापर करून लोकाभिमुख कठीण आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी “आरोग्य व्यवस्था’ निर्मितीला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे, असे मत आरोग्यसेवा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.
मुंढे यांनी आरोग्य सेवेतील पुणे येथील विभाग प्रमुखांची शनिवारी बैठक घेतली. तसेच विविध विभागांचा आढावा घेतला. आरोग्यसेवा विषयीची माहिती अद्यावत ठेवून त्यांचा नियोजन आणि संस्थांच्या सेवांच्या विकासासाठी वापर करावा, आरोग्यासंबंधी ऋतूनुसार आरोग्य सेवांची तयारी ठेवावी.
येणाऱ्या काळात साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती वर नियंत्रण ठेवावे, रोजच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून जिल्हा आणि प्रत्येक तालुक्यातील आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची यांच्याशी समन्वय आणि नियंत्रण ठेवून पाठपुरावा करावा. जिल्हा आणि गाव पातळीवरील संस्थांशी चांगला संवाद ठेवून रोजचा आढावा घेतला जावा अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होण्यासाठी आपला प्राधान्यक्रम असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत पुणे येथील आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि पुणे येथील सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक संचालक आणि विकासात्मक स्वयंसेवी संस्थेचे सल्लागार उपस्थित होते.





