व्यवसायिक बॅंकांनी व्याजदरात कपात करण्याची गरज

मुंबई – गेल्या दोन वर्षांमध्ये रिझर्व्ह बॅंकेने आपल्या रेपो दरांमध्ये कपात केली आहे. मात्र त्या प्रमाणात अजूनही व्यवसायिक बॅंकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात कपात केलेली नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्यवसायिक बॅंकांनी आगामी काळात आपल्या विविध कर्जावरील व्याजदरात कपात करण्याच्या शक्यतेवर विचार करावा असा आग्रह उद्योजकांच्या संघटनांनी केला आहे.
महागाई सहा टक्क्यांच्या पुढे जाऊनही रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने आज जाहीर केलेल्या पत धोरणामध्ये व्याजदर पूर्वीच्या कमी पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयाचे उद्योजकांनी स्वागत केले आहे.
पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी सांगितले की रिझर्व्ह बॅंकेने केवळ व्याजदर कमी ठेवलले नाहीत तर आगामी काळातही हे व्याजदर काही काळ कमी पातळीवर ठेवण्याचे संकेत दिले आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेने ज्या प्रमाणात व्याजदर कमी केले आहेत त्याप्रमाणात व्यवसायिक बॅंकांनी अजूनही व्याजदर कमी केले नाहीत. त्यामुळे बॅंकांनी विविध कर्जावरील व्याजदर कमी करण्याची गरज आहे.





