भाष्य : छत्तीसगडमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान

– हेमंत देसाई
छत्तीसगडमध्ये भाजपची पंधरा वर्षे सत्ता होती. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळविली. कॉंग्रेला अनुकूल वातावरण असताना भाजपसमोर कॉंग्रेसला हरविण्याचे आव्हान आहे.
छत्तीसगड या राज्यात येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका असून, तेथे विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसचे सरकार असून, भूपेश बघेल हे मुख्यमंत्री आहेत. जून महिन्यातच टी. एस. सिंगदेव यांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. बघेल आणि सिंगदेव यांच्यात मतभेद असून, मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्षांनी मुख्यमंत्रिपदी आपल्याला नेमावे, अशी मागणी सिंगदेव यांनी केली होती, असे सांगण्यात येते. परंतु आपण कधीही आळीपाळीने मुख्यमंत्रिपद मिळण्यासंबंधीच्या कराराची चर्चा केलेली नव्हती, असे सिंगदेव यांनी जाहीरपणे सांगितले आहे. ते काहीही असले, तरी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या दोन नेत्यांमधील मतभेद अथवा तणाव कमी केला आहे, असे स्पष्टपणे दिसते.
या महिन्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एका जाहीर सभेत भाषण केले. “छत्तीसगडच्या विकासामध्ये कॉंग्रेसचा पंजा मोठ्या भिंतीप्रमाणे आडवा आला आहे. या पक्षाने राज्याच्या जनतेचे हक्क हिसकावून घेतले. लूट करून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. कॉंग्रेससाठी छत्तीसगड हे केवळ एटीएम मशीन आहे’, अशी अत्यंत जहरी टीका मोदी यांनी केली आणि एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशशिंग फुंकले आहे. छत्तीसगडमधून कॉंग्रेसचे समूळ उच्चाटन केले, तर त्याचा लोकसभा निवडणुकीतही भाजपाला फायदा होईल, असा साधा हिशोब आहे.
त्यामुळे मोदी यांनी कॉंग्रेसवर तुफानी टीका सुरू केली आहे. दारूबंदी करण्याचे आश्वासन देऊनही कॉंग्रेसने ती केली नाही. उलट दारूच्या घोटाळ्यातून हजारो कोटी रुपयांची कमाई केली, असा आरोपही त्यांनी केला. अर्थात त्यांनी त्या संदर्भात कोणतीही आकडेवारी वा पुरावा दिलेला नाही! “कॉंग्रेस आपल्याविरुद्ध कटकारस्थान करेल, हल्ला करेल. पण जो घाबरतो, तो मोदी असू शकत नाही,’ अशी गर्जना देखील मोदी यांनी केली.
नऊ वर्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात केंद्रातील सरकारने छत्तीसगडमधील धान उत्पादकांना एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे, असा भाजपचा दावा आहे. छत्तीसगडमध्ये 7 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजनही मोदी यांनी केले. अंतागड ते रायपूर दरम्यान धावणाऱ्या नव्या रेल्वेला हिरवा झेंडा त्यांनी दाखवला. चार पदरी राष्ट्रीय महामार्गांचे उद्घाटन केले. आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत 75 लाख लाभार्थींना कार्ड वाटप करण्याची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते झाली.
कोणत्याही राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी भाजप या प्रकारे सत्ताधारी पक्षावर आरोप करतो आणि केंद्र सरकारच्या अनेकविध प्रकल्पांचा बार उडवून देतो. मात्र भाजपने छत्तीसगडमध्ये या पलीकडेही जाऊन पूर्वतयारी सुरू केली आहे. नेहमीप्रमाणे भाजप तेथे मेहनत घेईल यात शंका नाही. मोदींच्या सभांचा भाजपला निवडणुकीत उपयोग होईलच, परंतु स्थानिक नेतृत्वही तेवढेच ताकदीचे हवे आणि ते पुढे आणले पाहिजे असे छत्तीसगडमधील भाजप नेत्यांना रास्तपणे वाटत आहे.
22 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडला भेट दिली, तेव्हा प्रदेशातील नेत्यांनी त्यांच्यासमोर आपले हे मत स्पष्टपणे मांडले. छत्तीसगडमध्ये आता निवडणुका झाल्या, तर भाजपला 30 ते 32 जागा मिळतील, असे पक्षाने केलेल्या अंतर्गत पाहणीतून दिसून आले. मुख्यमंत्री बघेल हे राज्यात लोकप्रिय आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी प्रचारात भाजपनेही काही स्थानिक चेहरे पुढे केले पाहिजेत, हे छत्तीसगड प्रदेश भाजपच्या नेत्यांचे मत योग्यच आहे. 2003 ते 2018 अशी सलग पंधरा वर्षे छत्तीसगडमध्ये रमण सिंग हे भाजपचे मुख्यमंत्री होते. परंतु त्यानंतर सत्ता गेल्यावर भाजप विरोधी पक्ष म्हणून छत्तीसगडमध्ये यशस्वी ठरलेला नाही.
यावेळी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून आतापर्यंत तरी कोणालाही प्रोजेक्ट करण्यात आलेले नाही. याचा पक्षाला फटकाही बसू शकतो. भाजपने आदिवासी आणि मागास जातींवर लक्ष केंद्रित केले असले, तरी दलित आणि उच्च जातींकडे तेवढे लक्ष दिलेले नाही. तसे ते द्यायला हवे, असेही सांगितले जाते. माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांना पक्षात अजूनही अवास्तव महत्त्व दिले जात असल्यामुळे अन्य नेते नाराज आहेत. कॉंग्रेसची आठ ते दहा टक्के मते वळवल्याखेरीज यश मिळू शकणार नाही, हे देखील भाजपाला माहिती आहे.
2018 साली कॉंग्रेसला 68 जागा मिळाल्या आणि भाजपला केवळ 15. त्यावेळी दोन्ही पक्षांमधील मतांत 10 टक्क्यांचा फरक पडला होता. एवढा दारूण पराभव झाल्यानंतर पुन्हा रमण सिंग यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले जाऊ नये, अशी मागणी होत आहे. ती योग्यच आहे. छत्तीसगडमध्ये भाजप हा आता प्रमुख विरोधी पक्ष असला, तरी तळपातळीवर तो सक्रिय दिसत नसल्याचे अमित शहा यांचे मत आहे. त्यामुळे राज्यातील अन्य छोट्या छोट्या पक्षांशीसुद्धा आघाडी केली पाहिजे, अन्यथा भाजप कॉंग्रेसवर मात करू शकणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. “गोंडवन गणतंत्र पक्ष’ हा सुरगुजा क्षेत्रात प्रभावी आहे.
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले अरविंद नेताम या प्रसिद्ध आदिवासी नेत्याचा एक पक्ष आहे. बस्तरमध्ये त्यांची म्हणून काही मते आहेत. सुरगुजा आणि बस्तर येथे आदिवासींसाठीचे अनुक्रमे 14 व 12 मतदारसंघ राखीव आहेत. या जागांवर एकतर भाजपने उमेदवार उभे करावेत, अथवा या पक्षांशी युती करून कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होणार नाही हे पाहावे, अशी भाजपची व्यूहरचना असू शकते. छत्तीसगडमध्ये बहुजन समाज पक्षाचीही थोडी मते असून ती भाजपच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. ईडीच्या भीतीने सध्या मायावती या भाजपलाच अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत. राजस्थानमध्ये सध्या भाजपची हवा आहे. छत्तीसगडमध्ये मात्र आजतरी कॉंग्रेसच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे, असे दिसते.





