दखल : नेपाळमधील प्रलयाचे वास्तव
नेपाळमध्ये घडलेल्या महाप्रलयानंतर (Nepal Flood) तेथे आता पुन्हा मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. नेपाळमध्ये ही पूरस्थिती वारंवार का निर्माण होत आहे, याबाबत नवीन माहिती समोर येत आहे.

– डॉ. श्रीकांत कार्लेकर
Nepal Flood : नेपाळमध्ये घडलेल्या महाप्रलयानंतर (Nepal Flood) तेथे आता पुन्हा मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. नेपाळमध्ये ही पूरस्थिती वारंवार का निर्माण होत आहे, याबाबत नवीन माहिती समोर येत आहे.
नवीन उपग्रह प्रतिमांमधून, हिमनदी कोसळल्यामुळे 26 ऑगस्टला अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळच्या त्रिशुली नदीकाठी झालेल्या विध्वंसाची व्याप्ती समोर आली. पुराच्या (Nepal Flood) पाण्याचा आणि ढिगार्यांचा प्रचंड प्रवाह खोर्यातून वाहून गेल्याने गावे, पूल आणि जलविद्युत केंद्रे कशी उद्ध्वस्त झाली, हे पुरापूर्वीच्या आणि नंतरच्या प्रतिमांमधून स्पष्टपणे दिसून आले.
त्रिशुली नदीत प्रवाहाच्या दिशेने 2.5 किमीपेक्षा जास्त अंतरावर 100 मीटर उंचीपर्यंत चिखल साचलेला दिसत होता. काही अंतर दक्षिणेला तिमुरे नावाचे गाव आहे, जे आता जवळजवळ नाहीसे झाले आहे. या ठिकाणी नदीचे किनारे तीव्र उताराचे असून, या उतारावर असलेली बहुतेक घरे आता नाहीशी झाली आहेत किंवा चिखलाने झाकली गेली आहेत.
नदीच्या प्रवाहाच्या दिशेने आणखी 10 किमी खाली, जिथे त्रिशुली नदी शायब्रु बेसी जवळून नागमोडी वळणे घेत वाहते, तिथे उपग्रहाच्या प्रतिमांमध्ये आता ते गाव चिखल, दगड आणि इतर ढिगार्याखाली झाकलेले दिसत आहे. पूल आणि जलविद्युत केंद्रासह अनेक घरे आणि इतर वास्तू नाहीशा झाल्या आहेत. पुराच्या पूर्ण तडाख्याला सामोरे गेलेल्या मोठ्या गावांपैकी एक त्रिशुली होते. सीमेपासून सुमारे 45 किमी खाली असलेल्या या शहराच्या आणि आसपासच्या शेतजमिनीच्या उपग्रह प्रतिमेत दिसते की, ही संपूर्ण वस्ती अक्षरशः नाहीशी झाली आहे.
लांगटांग लिरुंग या हिमाच्छादित प्रदेशात असलेल्या अशा प्रकाराच्या लटकत्या हिमनद्या म्हणजे Hanging glaciers पर्वतांच्या उतारांच्यावर किंवा नदी दर्यांच्या दोन्ही बाजूच्या कड्यांवर धोकादायकपणे स्थिरावलेले बर्फ असते. हे बर्फ दरीच्या तळापर्यंत न पोहोचता मुख्यत्वे थंड तापमानामुळे हिमनदी खोर्यांच्या वरच्या काठावर लटकून टिकून रहाते.
हे बर्फ तापमान वाढीमुळे अचानक तुटून मुख्य हिमनदीपासून वेगळे होते आणि त्यामुळे प्रचंड हिमप्रपात होतात आणि प्रवाहाच्या खालच्या बाजूला विनाशकारी पूर येतात. अशा अनेक हिमनद्या नदीच्या खोर्यांवर किंवा उघड्या खडकांवर पसरलेल्या असतात. याचा अर्थ असा की कोसळल्यास त्या थेट प्रवाहामध्ये पडतात आणि त्यामुळे हिंसक चिखलाचे प्रवाह किंवा पूर येतात.
ही आपत्ती भूकंपामुळे नव्हे, तर हिमालयाच्या उंच भागात हिमनदीचा अग्रभाग कोसळल्यामुळे आणि उताराची वेगाने झालेली पडझड यामुळे घडली होती. कोसळणार्या बर्फ आणि खडकांच्या प्रचंड शक्तीमुळे या आघाताची 5.2 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूगर्भशास्त्रज्ञांनी इशारा दिला होता की हिमस्खलनाच्या ढिगार्यांमुळे तयार झालेल्या तात्पुरत्या नैसर्गिक धरणांमध्ये पाणी साचले असल्यामुळे उर्वरित तलाव फुटून दुय्यम स्वरूपाचा अचानक पूर आणि पाण्याचा लोंढा पुन्हा येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वेगाने होणारी प्रादेशिक तापमानवाढ, कायम गोठलेली जमीन (Permafroast) वितळणे आणि हिमालयातील बर्फ वितळणे यांमुळे हिमालय पर्वताच्या उतारांची स्थिरता सतत खालावत असून, भविष्यात अशा तर्हेच्या धोक्यांची शक्यता वाढत आहे. अशा प्रकारच्या घटना हिमालयात यापूर्वीही घडल्या आहेत, परंतु यावेळी घडलेली ही घटना अनेक कारणांमुळे जास्त संहारक ठरली.
हवामान बदलामुळे जी तापमान वाढ होत आहे त्यामुळे जगभरातील बर्फ आणि हिमनद्या वितळण्याची प्रक्रिया सध्या अधिक वेगवान होत आहे. हवामान बदलामुळे अशा घटनांची तीव्रता भविष्यात वाढण्याची शक्यता नक्कीच आहे. हवामान बदलाची तीव्रता वाढत असल्यामुळे, जगभरातील हिमनद्या हिमालयासारख्या उंच प्रदेशांमध्येही वितळत आहेत.
हिमालय विशेषतः असुरक्षित आहे, कारण या अतिउंच पर्वतांचे तीव्र उतार पर्माफ्रॉस्टचे बनलेले आहेत, म्हणजेच शतकानुशतके गोठलेले खडक आणि माती यामुळे कायम गोठलेले आहेत. तापमान वाढत असल्यामुळे, हे उतार वितळू लागले आहेत किंवा अस्थिर होत आहेत. जर भूकंप झाला किंवा डोंगर कोसळला, तर त्यामुळे अचानक आणि विनाशकारी चिखलाचा प्रवाह (Nepal Flood) इथे केव्हाही सुरू होऊ शकतो.
या प्रदेशात अचानक पूर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 8 जुलै, 2025 रोजी याच भोटेकोशी नदीला अचानक पूर आला होता, ज्याचे कारण नेपाळ-चीन सीमेजवळील ल्हेंडे नदीतील हिम सरोवराचा उद्रेक असल्याचा निष्कर्ष नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागाने त्यावेळी काढला होता.आत्ताच्या या आपत्तीनंतर नेपाळमधील अनेक नद्यांचे प्रवाह चिखल आणि कचर्यामुळे अडवले जाऊन त्यांत वाहत आलेल्या गाळाची धरणे किंवा बंधारे तयार झाले. त्यामुळे हिम प्रदेशात हिमसरोवरे (Glacial lakes) तयार झाली.
अशा सरोवरांचे बंधारे भविष्यात फुटून त्यानंतर अधिक मोठे पूर येण्याची मोठी शक्यता असते. शास्त्रज्ञांनी यापूर्वीच असा इशारा दिला आहे की, हिमालयीन प्रदेशात अशी अनेक संभाव्य धोकादायक हिम सरोवरे असल्याने, हा प्रदेश अशा प्रकारच्या पुरासाठी फारच असुरक्षित आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने केलेल्या एका अभ्यासात नेपाळ, भारत आणि तिबेटमध्ये 3,624 हिम सरोवरे असल्याचे म्हटले आहे. यापैकी 47 सरोवरे संभाव्य धोकादायक आणि फुटण्याचा धोका असलेली असल्याचे नक्की करण्यात आले आहे, ज्यात नेपाळमधील 21 सरोवरांचा समावेश आहे.
या विध्वंसक पुरापूर्वी कोणत्याही अंदाजात या ठिकाणी हिमस्खलन होईल असे भाकीत केले गेले नव्हते. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत, हिमनदी कोसळल्यामुळे आणि त्यामुळे अचानक आलेल्या पुरामुळे बाधित लोकांपैकी 13,795 लोकांचा बचाव करण्यात आला आहे.
मात्र अजूनही अंदाजे 5,280 लोक या आपत्तीनंतर (Nepal Flood) बेपत्ता झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे. वेगाने उष्ण होत असलेल्या, हिमालयातील लेंडे खोला जवळील लांगटांग लिरुंग सारख्या भागातील अशा लटकत्या हिमनद्यांच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधणारी एक सूचक घटना म्हणून हिमनद्या तज्ज्ञ आता या घटनेकडे पहात आहेत.






