पुणे बार असोसिएशनचा आजीव सभासदत्व दाखला देण्यास सुरूवात

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनचा आजीव सभासदत्व दाखला देण्यास सुरूवात झाली आहे. दोन दिवसा आयकार्डचेही वाटप करण्यात येणार आहे. पुणे बार असोसिएशनच्या जानेवारी अखेरला होणाऱ्या निवडणुकीत मतदानासाठी बारचे आजीव सभासद असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आतापर्यंत सुमारे 2 हजार वकील आजीव सभासद बनले आहेत. अधिकाधिक वकिलांनी बारचे सभासद बनावे, असे आवाहन पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी केले आहे. आजीव सभासदत्व दाखला देताना अध्यक्ष ऍड. मुळीक, माजी अध्यक्ष ऍड. श्रीकांत आगस्ते, उपाध्यक्ष ऍड. योगेश तुपे, सचिव विकास बाबर, माजी सचिव मनिष मगर, ऍड. खंडेराव टाचले, ऍड. शिवाजीराव देशमुख यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.
पूर्वी बार असोसिएशनच्या सभासदांची वार्षिक नोंदणी होत असत. अशा सभासदांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळत असत. मात्र, पुणे बार असोसिएशनच्या 11 मार्च 2020 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत आजीव सभासदत्वाबाबत ठराव संमत करण्यात आलेला आहे. पुणे शहरातील न्यायालयांमध्ये वकिली करणाऱ्यांना आजीव सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. त्यांनाच बारच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. शिवाजीनगर न्यायालय आवारातील पुणे बार असोसिएशनच्या ऑफीसमध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत फॉर्म्स भरून देऊन न्यायालयाच्या आवारातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेमधील करंट अकाउंट नंबर 39989765309 मध्ये रक्कम रुपये दोन हजार रुपये भरून आजीव सभासदत्व मिळणार आहे. “गुगले पे’ नेही सभासदाचे शुल्क भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.





