Pune : दिलासादायक! पुण्यात २४ तासांत GBS च्या एकाही रुग्णाची नोंद नाही; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन सूचना जारी

पुणेः पुणे शहरात गेल्या २४ तासांमध्ये जीबीएसच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. ही बातमी पुणेकरांसाठी दिलासा देणारी आहे. राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या १२७ असून २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आत्तापर्यंत या आजाराने दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील जीबीएसची रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य सचिव निपुण विनायक हे गुरुवारी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांनी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत झालेल्या बैठकीत पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी औंध जिल्हा रुग्णालय आणि ससून सर्वेापचार रुग्णालयाला भेट दिली.
या दोन्ही रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची पाहणी केले. त्याचबरोबर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॅाक्टरांकडून माहिती घेतली. राज्यातील जीबीएसची रुग्ण संख्या १३० असून पुणे महापालिका क्षेत्रात २५, महापालिकेत नव्याने समाविष्ठ झालेल्या गावात ७४ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात १३, पुणे ग्रामीण ९ आणि इतर जिह्यांतील ९ रुग्ण पुण्यात आहेत.
आता जीबीएस आजाराबाबत आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुण्यात ९ जानेवारीपासून जीबीएसचे रुग्ण आढळून येत आहे. आता राज्यातील इतर भागातही रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या आहेत सूचना
क्षेत्रीय पातळीवर शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना करावी, आजाराचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करावा, प्रशासनातील विविध विभागांसोबत समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहचण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा, पुरेशा खाटांची संख्या तसेच औषधांची उपलब्धता यांची खात्री करावी, उपचारांसाठी शासकीय योजनेतून रुग्णांना मदत करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





