दिलासादायक! देशात करोनाच्या रुग्णसंख्येत घट; गेल्या 24 तासांत 2 लाख 34 हजार 281 नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात आलेल्या करोनाच्या तिसऱ्या लाटेचे स्वरूप आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. कारण आता काही प्रमाणात रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवीन रुग्ण आढळले असून 893 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील दैनंदिन सकारात्मकता दर आता 14.50 टक्क्यांवर आला आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 4 कोटी 10 लाख 92 हजार 522 झाली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 18 लाख 84 हजार 937 वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 94 हजार 91 झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत तीन लाख 52 हजार 784 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 87 लाख 13 हजार 494 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 165 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 62 लाख 22 हजार 682 डोस देण्यात आले. देशभरात आतापर्यंत 165 कोटी 70 लाख 60 हजार 692 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.




