आ. गोरेंमुळे उत्तर माणमधील वंचित गावांना मिळणार पाणी

दहिवडी – माण तालुक्याच्या उत्तर भागातील गावे वर्षानुवर्षे सिंचनापासून वंचित होती. या भागातील गावे सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी आ. जयकुमार गोरे यांनी अथक प्रयत्न केले आहेत. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर) या भागासाठी वरदायिनी ठरणार आहे. या योजनेत उत्तर व पश्चिम भागातील वंचित गावांचा समावेश करून, पाणी दिले जाणार आहे. आ. गोरे यांच्यामुळेच वंचित भागांना पाणी मिळणार असल्याचे पाचवडचे माजी सरपंच नवनाथ शिंगाडे यांनी सांगितले.
जिहे-कठापूर योजनेचे पाणी पाचवड, ता. माण येथे आणण्यासाठी सर्वेक्षण सुरू होते. तेथे ग्रामस्थांनी भेट दिली. त्यावेळी शिंगाडे बोलत होते. पाचवडचे सरपंच नितीन इंगळे, बिजवडीचे उपसरपंच अमित भोसले, एकनाथ कदम, नानासाहेब जगदाळे, किसन जगदाळे, हिंदुराव जगदाळे, भाऊसाहेब शिंगाडे, आप्पासाहेब जगदाळे, दादासाहेब जगदाळे, अक्षय जगदाळे, सदाशिव पवार, सनी गलंडे, धनाजी पाटील, माणिक मोरे, विजय भोसले, पप्पू दडस व अधिकारी उपस्थित होते.
शिंगाडे म्हणाले, पाण्याच्या फेरवाटपात आ. जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्या भागासाठी सव्वा टीएमसी पाणी आरक्षित करून घेतले आहे. पहिल्या टप्प्यात या योजेनचे पाणी माणच्या उत्तर भागातील गावांना देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुसर्या टप्प्यात तालुक्याच्या उत्तर व पश्चिम भागातील वंचित गावांना पाणी कोणत्या मार्गाने द्यायचे, यासाठी सर्वेक्षण गरजेचे होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी आ. गोरे यांनी तोंडले व महिमानगड येथे कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर विविध गावांमध्ये गतीने सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर, निधी आणून ही कामे सुरू करण्यासाठी आ. गोरे हे रात्रीचा दिवस करत आहेत. जिहे-कठापूरचे पाणी आपल्या शिवारात आणण्यासाठी सर्वांनी जयाभाऊंना खंबीर साथ द्यावी.
या गावांमध्ये होतेय सर्वेक्षण
खुटबाव, कारखेल, शिखर शिंगणापूर, वावरहिरे, अनभुलेवाडी, तोंडले, जाधववाडी, राजवडी, मोगराळे, बिजवडी, पांगरी, टाकेवाडी, पाचवड, हस्तनपूर, थदाळे, डंगिरेवाडी, शंभूखेड, हवालदारवाडी, मोही, इंजबाव, दानवलेवाडी, येळेवाडी, परकंदी, पश्चिम भागातील महिमानगड पंचक्रोशीतील नऊ गावांचा समावेश जिहे-कठापूर योजनेत होणार आहे. या गावांमध्ये सर्वेक्षण होत आहे.





