आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळणार मोठी संधी

सातारा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ रचनेमध्ये सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मोठी संधी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. सातारा व जावळी तालुक्यांतून तसा राजकीय आग्रह वाढू लागला आहे. साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपच्यावतीने मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी घेऊ शकतील, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
शिवेंद्रसिंहराजे छत्रपती राजघराण्यातील सन्माननीय सदस्य असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मर्जीतील आमदार म्हणून ते ओळखले जातात. 2019 मध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. महाविकास आघाडीच्या काळातही त्यांनी भाजपमध्ये राहूनच उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेसशी केलेली सलगी कायमच चर्चेत राहिली. मात्र, यामध्ये भाजप कार्यकर्त्यांबाबत त्यांनी कधी अंतर पडू दिले नाही व पक्षाचा प्रोटोकॉल त्यांनी व्यवस्थितरित्या पाळला. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना मोठी संधी दिली जावी, अशा अपेक्षा सातारा आणि जावळीमधून वाढू लागल्या आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी विक्रमी विकास कामे मंजूर करून सातारा व जावळी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
साताऱ्यातील प्रांत कार्यालयासाठीसुद्धा त्यांचा पाठपुरावा सुरू असून ते कामही लवकरच अंतिम टप्प्यात येण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीमध्ये बाळासाहेब पाटील सहकार मंत्री होते. आता नवीन सरकार स्थापन होत असताना या पदासाठी जिल्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्या नावाची चर्चा प्रकर्षाने होऊ लागली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंक व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकारामध्ये आमदार भोसले गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहेत.
स्वच्छ प्रतिमा तळागाळात असलेले कार्यकर्त्यांची जाळे, सातारा आणि जावळी तालुक्याच्या राजकारणावरील घट्ट पकड, सहकारी संस्थांचा विकास आणि त्यांची उत्तम बांधणी ही शिवेंद्रसिंहराजे यांची जमेची बाजू आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपद मिळाल्यास सातारा जिल्ह्यात भाजपला निश्चितच उभारी मिळणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते, जनता आमदार भोसले यांच्या मंत्रिपदाकडे डोळे लावून बसली आहे. सातारा व जावळी तालुक्यांतील रखडलेल्या प्रलंबित प्रश्नांना शिवेंद्रसिंहराजे मंत्री झाल्यास निश्चितच प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास सातारा आणि जावळी तालुक्यातील जनतेला आहे.





