मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी आज मुंबईमध्ये अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. “लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. फक्त आपल्यापर्यंत आलं नाही. लोकांनी मतदान केलं. पण केलेलं मतदान कुठे तरी गायब झालं. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल. कोणी कोणत्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो”, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर सर्वांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक जण ईव्हीएमवर संशय व्यक्त करत आहेत. यादरम्यान काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने राज ठाकरेंना भावनिक साद घातली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर या अशी भावनिक साद बाळासाहेब थोरात जाहीर सभेत घातली. काय म्हणाले बाळासाहेब थोरात? “लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी आहे. लोकशाही मोडण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणुक आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा स्वायत्त संस्थानच्या माध्यमातून लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चालला आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर आलं पाहिजे”, अशी साद काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरेंना घातली आहे.