पाटण -सत्यजित पाटणकर कोण? असा प्रश्न विचारणाऱ्या शंभूराज देसाई यांच्यात हिंमत असेल, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ते खरे वारसदार असून पुन्हा निवडून येण्याची खात्री असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला समोर यावे. मग तुम्हाला सत्यजित पाटणकर कोण ? हे दाखवून देतो, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले. तारळे ता. पाटण येथे तारळे सोसायटी विस्तारित इमारतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजाभाऊ शेलार, साहेबराव देशमुख, सदाभाऊ जाधव, मधुकर पाटील, बाळासाहेब राजेमहाडिक, अभिजित जाधव, हणमंतराव खबाले पाटील, सुहास माने, महेंद्र मगर, सचिन सुतार, शशिकांत पाटील, सरपंच प्रकाश जाधव, लहुराज कदम, बाळासाहेब पाटणकर, सोसायटी अध्यक्ष किसनराव जाधव, उपाध्यक्ष सर्जेराव जाधव उपस्थित होते. सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, चालू झालेनंतर काही दिवसांनी बंद पडलेली संस्था कशी उभारी घेऊ शकते, एक सहकारी संस्था काय करू शकते, सर्वासामान्य सभासदांचा उद्धार कसा करावा, याचे तारळे विकास सेवा सोसायटी मूर्तिमंत असल्याचे सांगत आजी-माजी पदाधिकारी यांची कौतुकाने पाठ थोपटली. त्यामुळे सभासदांनी विरोधाला विरोध न करता सोसायटीला सहकार्य करा, असे आवाहनही पाटणकर यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ माजी संचालक सभासदांचा, माजी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रल्हाद जाधव, दत्तात्रय पाटील, नवनाथ जाधव, नानासो जाधव, दिनकर जाधव, हणमंत काटकर,आदी संचालक उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ शेलार, सुभाष पवार, साहेबराव देशमुख, सदाभाऊ जाधव, मधुकर पाटील,अभिजित जाधव, बाळासाहेब पाटणकर सुहास माने, आदींनी मनोगते व्यक्त केली. किसनराव जाधव यांनी प्रास्तविक केले. स्वागत व सूत्रसंचालन शशिकांत पाटील यांनी तर आभार दत्तात्रय पाटील यांनी मानले. देसाईंना अनेकदा आस्मान दाखवले शंभूराज देसाई यांना आजपर्यंत अनेक निवडणुकात आम्ही आस्मान दाखवले आहे. त्यामुळे सत्यजित पाटणकर कोण; हे त्यांना चांगलेच माहित आहे. कारण याच पाटणकरांनी आपल्या कर्तृत्वातून स्थानिक ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, सहकारी संस्था ते अगदी जिल्हा बॅंकेतही स्वतः शंभूराज देसाई यांच्यासह त्यांच्या गटाला पाणी पाजले आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या विजयाने अथवा सत्ता मिळालेल्या गद्दार देसाईंना याचे महत्त्व कसे समजणार ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.