‘तुमच्यात हिंमत असेल तर रस्त्यावर उतरून माझ्यावर हल्ला करा’; राज्यपालांचे केरळ सरकारला आव्हान

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष , डावे पक्ष आणि द्रमुकच्या नेत्याच्या मित्रपक्षांसह येत्या 15 नोव्हेंबर रोजी राजभवनासमोर मोठे आंदोलन करणार आहेत. खासदार तिरुची शिवा देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि राज्य सरकार यांच्यात या निदर्शनावरून शाब्दिक युद्धही सुरू झाले आहे. दरम्यान, राज्यपालांनी चक्क सरकारला ओपन चॅलेंज दिले आहे.
यासंदर्भात बोलताना राज्यपाल म्हणाले की, १५ नोव्हेंबरला माझ्या अनुपस्थितीत मोर्चा काढू नका. ज्या दिवशी मी राजभवनात असतो त्या दिवशी मोर्चाचे आयोजन करा, तुमच्यात हिम्मत असेल तर मी तिथे येईन आणि सार्वजनिक चर्चा करेन असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. तसेच कुलगुरूंना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखले जात आहे, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राज्यपालांनी केला.
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान पुढे म्हणाले की, “राज्य सरकारने घटनात्मक यंत्रणा उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मी त्यांना विनंती करेन की पुढे जा, आणखी समस्या निर्माण करा, राजभवनात घुसा, हिंमत असेल तर रस्त्यावर उतरून माझ्यावर हल्ला करा. मुख्यमंत्री मला ओळखण्यास नकार देत आहेत पण मी त्यांना ओळखतो.”




