आ. आशुतोष काळेंनी फिरविले निळवंडे कालव्याचे चाक

कोपरगाव – कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यातून नियमित पाणी मिळावे व नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी माझे सातत्याने प्रयत्न असतात. त्यामुळे निळवंडेचे ओव्हरफ्लोचे पाण्यातून जिरायती गावातील सर्वच पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले भरून द्या. तुम्हाला अडचण आल्यास जेसीबी व इतर कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मला सांगा. मात्र, जोपर्यंत जिरायती गावातील सर्व पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले पूर्ण क्षमतेने भरले जात नाही, तोपर्यंत निळवंडे कालवे बंद करू नका, अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिल्या.
निळवंडेचे ओव्हरफ्लोचे पाणी निळवंडे डाव्या कालव्याच्या ६५ किमीपासून सुरू होणाऱ्या तळेगाव कालवा शाखेतून जिरायती गावाला आ. आशुतोष काळे यांच्याहस्ते निळवंडे कालव्याचे चाक फिरवून पाणी सोडण्यात आले. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. ते म्हणाले की, अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघातील जिरायती गावांना निळवंडेचा मोठा आधार मिळाला आहे. यावर्षी जरी धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन धरणे पूर्ण क्षमतेने भरले असले तरी कोपरगाव मतदार संघात अद्यापही समाधानकारक पर्जन्यमान झालेले नाही. थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसामुळे खरीप पिके जरी जोमात असली तरी मतदारसंघातील विहीरींना अद्यापही पाणी उतरलेले नाही, ही परिस्थिती जिरायत भागात देखील वेगळी नाही.
निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून या जिरायती गावांना मोठा दिलासा मिळणार असून पिण्याबरोबरच सिंचनाचा देखील प्रश्न मार्गी लागणार आहे. सर्व पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले भरल्यानंतर भूगर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत जिरायती गावातील सर्व पाझर तलाव, बंधारे, ओढे, नाले पूर्ण क्षमतेने भरले जात नाही, तोपर्यंत निळवंडे कालवे बंद करू नका, अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या.





