Indapur : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला उद्योजकतेची जोड
Indapur :विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना रुजविणे, व्यवसायाचे प्रत्यक्ष ज्ञान देणे आणि भविष्यात नोकरीच्या संधी शोधण्याबरोबरच स्वतः रोजगारनिर्मिती करण्यासाठी त्यांना सक्षम बनविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

इंदापूर : केवळ पुस्तकी ज्ञानाच्या चौकटीत न अडकता शिक्षणाला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली, तर विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून उद्योजकतेचा नवा मार्ग खुला होऊ शकतो. याच संकल्पनेला मूर्त स्वरूप देत इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब येथे वाणिज्य विभाग आणि उद्योजकता विकास कक्षाच्या वतीने उद्योजकता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सुगंधी उटणे, शिकेकाई, अत्तर, आकर्षक आकाशकंदील आणि रंगीत पणत्यांची निर्मिती करून आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यवसायाची जोड देणारा हा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना रुजविणे, व्यवसायाचे प्रत्यक्ष ज्ञान देणे आणि भविष्यात नोकरीच्या संधी शोधण्याबरोबरच स्वतः रोजगारनिर्मिती करण्यासाठी त्यांना सक्षम बनविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे उद्घाटन संस्थेच्या पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग, विश्वस्त राही रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे, वाणिज्य विभाग समन्वयक डॉ. विलास बुवा, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. योगेश खरात आणि उद्योजकता विकास कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. ज्ञानेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन रुपनवर यांनी केले, तर प्रा. सोनाली चव्हाण यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेल्या वस्तूंचे मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावसायिक कौशल्ये आणि उद्योजकतेचे व्यावहारिक ज्ञान मिळावे, यासाठी संस्था नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य संस्थेच्या वतीने केले जाईल, अशी ग्वाही संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच स्वतःमधील कौशल्ये ओळखून त्यांना व्यवसायाची जोड द्यावी. केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या क्षमतेवर रोजगारनिर्मिती करण्याचा दृष्टिकोन विकसित करावा, असे आवाहनही त्यांनी
वर्षभर चालावा उपक्रम -राही रणसिंग
संस्थेच्या विश्वस्त राही रणसिंग यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अशा प्रकारचे उपक्रम केवळ दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता वर्षभरातील विविध सण, उत्सव आणि दैनंदिन गरजांनुसार विद्यार्थ्यांनी लोकोपयोगी वस्तू तयार करून त्यांची विक्री करावी, असे त्यांनी सांगितले. वस्तूंची निर्मिती करणे, त्यांची किंमत निश्चित करणे, उत्पादन खर्चाचा हिशेब ठेवणे, ग्राहकांशी संवाद साधणे आणि विक्रीचे नियोजन करणे, या संपूर्ण प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बाजारपेठेचा अनुभव मिळेल. यातून त्यांच्यामध्ये व्यवहारज्ञान, आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबनाची भावना विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





