Pimpri-Chinchwad : रंग बदलणारे दिवे अन् बॉटल लाइटची चलती; घराघरांत रोषणाईची लगबग
Pimpri-Chinchwad : बाजारात आधुनिक दिव्यांना पसंती; पारंपरिक समईचे महत्त्वही अबाधित

पिंपरी – दिवाळीच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड नगरी प्रकाशात न्हाऊन निघण्यास सज्ज झाली आहे. यंदा केवळ दारापुरते दिवे न लावता संपूर्ण घराला फेस्टिव्ह लूक देण्यावर नागरिकांचा भर आहे. बाजारात नव्याने आलेले रंग बदलणारे दिवे, मल्टिकलर ट्री आणि बॉटल लाइट खरेदीसाठी पिंपरी, चिंचवड आणि भोसरीच्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे.
दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरभरात सजावटीची लगबग सुरू झाली आहे. घराचे मुख्य प्रवेशद्वार, खिडक्या, बाल्कनी आणि अंगण सजवण्यासाठी विविध प्रकारच्या रोषणाईचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे.
पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत घराचा कानाकोपरा उजळवून टाकण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. यंदा साध्या माळांऐवजी कल्पक लायटिंगला अधिक मागणी आहे. प्रवेशद्वारावर लटकणाऱ्या रंगीत झालरी, खिडक्यांसाठी आकर्षक बॉटल लाइट, तर बाल्कनीसाठी मल्टिकलर लायटिंग खरेदी केली जात आहे.
अंगणात ठेवता येणारे मल्टिकलर ट्री आणि फ्लॉवर लायटिंग विशेष आकर्षण ठरत आहेत. सातत्याने रंग बदलणाऱ्या दिव्यांमुळे घराला उठावदार लूक मिळत आहे.
इलेक्ट्रिक दिव्यांची मोठी रेलचेल असली, तरी संस्कृतीचा भाग असणाऱ्या पितळी व तांब्याच्या समईचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. देवघरासह मुख्य दारापाशी अखंड तेवणाऱ्या पारंपरिक समईची खरेदी उत्साहात सुरू आहे. यासोबतच विजेवर चालणाऱ्या आकर्षक समईंचा पर्यायही नोकरदार वर्ग निवडत आहे.
सर्वसामान्यांचे बजेट लक्षात घेऊन विक्रेत्यांनी विविध दरांतील पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. १०० फुटांची बॉटल लाइट ४०० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर मल्टिकलर माळांचे दर १५० रुपयांपासून सुरू होतात. मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणाऱ्या दरांमुळे खरेदीला वेग आला आहे.
दिवाळी सजावटीचे दरपत्रक
सजावटीचा प्रकार – अंदाजे दर
१०० फूट बॉटल लाइट – ४०० रुपये
मल्टिकलर लायटिंग – १५० ते ६०० रुपये
फ्लॉवर लायटिंग – ४५० रुपये
झालर लायटिंग – ४५० रुपये
मल्टिकलर ट्री – ५०० रुपये
ट्यूब लायटिंग – ४०० रुपये
समई (जोडी) – ४०० ते ९०० रुपये
Satara: जिल्ह्यातील वर्चस्व ठरविण्यासाठी आज मतदान; जिल्हा बँक निवडणुकीसाठी २०२१ मतदार बजावणार हक्क





