Satara: जिल्ह्यातील वर्चस्व ठरविण्यासाठी आज मतदान; जिल्हा बँक निवडणुकीसाठी २०२१ मतदार बजावणार हक्क
Satara जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ संचालक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही निवडणूक राजकारणातील नेतृत्वाची ताकद, सहकारातील पकड आणि आगामी राजकीय वाटचालीची दिशा तपासणारी ठरणार आहे.

Satara: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेचा फैसला करण्यासाठी उद्या रविवारी (दि. १) ११ तालुक्यांत मतदानाची रणधुमाळी रंगणार आहे. सहकार विभागाची संपूर्ण यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली असून, २०२१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर वर्चस्व कोणाचे राहणार आणि महायुतीच्या राजकीय समीकरणात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेची ही निवडणूक केवळ संचालक निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही निवडणूक राजकारणातील नेतृत्वाची ताकद, सहकारातील पकड आणि आगामी राजकीय वाटचालीची दिशा तपासणारी ठरणार आहे. विशेषतः माण तालुक्यात ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे विरुद्ध मनोज पोळ, पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर, कोरेगाव तालुक्यात सुनील खत्री विरुद्ध सुनील माने, फलटणमधील संजीवराजे नाईक निंबाळकर व समशेरसिह नाईक निंबाळकर आणि कराड तालुक्यात उदयसिंह पाटील उंडाळकर विरुद्ध धनंजय पाटील या पाच तालुक्यांतील लढतींनी निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे.
याठिकाणी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, स्थानिक राजकीय गटांचे शक्तिप्रदर्शन आणि मतदारांची मनधरणी अंतिम टप्प्यापर्यंत सुरु होती. जिल्हा बँकेच्या रणांगणात भारतीय जनता पक्ष आक्रमक लढत देणार असून अध्यक्षपदावर दावा सांगण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे अनेक दिग्गज संचालक दहा वर्षांच्या निकषावर रणांगणाबाहेर गेल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांचा दबावगट नक्की कसा काम करणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारल्याने महायुतीतील संघटित प्रयत्नांच्या यशात मिठाचा खडा पडला आहे. त्यामुळे साताऱ्यात खरे कोणी कोणी काम केले याची कुंडली मांडण्याची तयारी भाजपच्या वरिष्ठांनी केली आहे. अशाच प्रकारांची पुनरावृत्ती जिल्हा बँकेचे निवडणुकीत होऊ नये यासाठी भाजपच्या चाणक्यांनी मोर्चेबांधणी मजबूत केली आहे.
जिल्हा परिषदेचा अनुभव लक्षात घेता जिल्हा बँकेच्या लढतींना सुद्धा राजकीय संवेदनशीलता अधिक आहे. त्यामुळे जिल्हा पोलिसांनी सुद्धा तालुक्यात अकरा ठिकाणी मजबूत बंदोबस्त ठेवला आहे. निवडणूक प्रभारी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्याकडून सर्व त्या राजकीय तयारीचा सुरुची निवासस्थानी शनिवारी धावता आढावा घेतला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सध्या सोलापूरच्या राजकीय रणांगणात व्यस्त असल्याने रिंगणाच्या बाहेरून शिवेंद्रसिंहराजे स्वतःजिल्हा बँकेसाठी मोर्चा संभाळून आहेत.
निवडणुकीच्या रणांगणात महायुतीतील नेत्यांची राजकीय गणितेही कसोटीला लागली आहेत. एकीकडे एकत्रित राजकीय ताकदीचा दावा, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील गटबाजी, नेतृत्वाचे वर्चस्व आणि उमेदवारांची वैयक्तिक ताकद अशा अनेक घटकांचा निकालावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या छत्राखाली कोणाचे राजकीय वजन वाढणार आणि कोणाला मतदारांचा कौल स्वीकारावा लागणार, हा औत्सुक्याचा विषय बनला आहे.
रविवारी मतदान पार पडल्यानंतर मंगळवार, दि. ३ रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, मतमोजणीचे ठिकाण आणि वेळ सहकार प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रचाराचे डावपेच संपून मतपेटीतून राजकीय शक्तीपरीक्षेचा निकाल बाहेर पडण्याची वेळ आली आहे. जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हाती जाणार, याचे उत्तर मंगळवारी मिळणार आहे.





