कोलकता : पश्चिम बंगालमधील एका कोळसा खाणीत सोमवारी भीषण स्फोट झाला. त्या दुर्घटनेत 6 जण मृत्युमुखी पडले, तर तिघे जखमी झाले. बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका गावात दुर्घटना घडली ती खाण आहे. त्या खाणीत एका ट्रकमध्ये डिटोनेेेेटर्स ठेवण्यात आले होते. त्यांचा अचानकपणे स्फोट झाला.त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांत प्रामुख्याने खाणकाम करणाऱ्या मजुरांचा समावेश आहे. दुर्घटना घडलेली खाण पश्चिम बंगाल ऊर्जा विकास महामंडळाच्या अखत्यारीत येते. ते महामंडळ राज्य सरकारकडून चालवले जाते. स्फोटाचे नेमके कारण तातडीने समजू शकले नाही. त्या कारणाचा शोध घेण्यासाठी तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. कुठलीही सावधगिरी न बाळगता ट्रकमधून डिटोनेटर्स उतरवण्यात आले. त्या निष्काळजीपणामुळे स्फोट झाल्याचा आरोप भाजपने केला. दरम्यान, बंगाल सरकारने मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 30 लाख रूपयांची मदत जाहीर केली. त्याशिवाय, मृतांच्या कुटूंबांमधील एका सदस्याला सरकारी नोकरी उपलब्ध केली जाणार आहे. जखमींच्या उपचारासाठी प्रत्येकी २ लाख रूपये दिले जातील.