CM Vijay meets PM Modi : मुख्यमंत्री विजय यांनी पीएम मोदींची भेट का घेतली ? ‘या’ 3 महत्वाच्या विषयांवर चर्चा
CM Vijay meets PM Modi : पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मेकेदातू धरण प्रकल्प, तमिळनाडूतील मच्छीमारांची अटक, तसेच ‘तमिळ थाई वाझ्थू’ या राज्याच्या प्रार्थनागीतासंदर्भातील वाद या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

CM Vijay meets PM Modi : तमिळनाडूचे मुख्यमंत्री तथा तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे संस्थापक सी. जोसेफ विजय यांनी बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत राज्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजय यांचा हा पहिलाच अधिकृत दिल्ली दौरा ठरला.
पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मेकेदातू धरण प्रकल्प, तमिळनाडूतील मच्छीमारांची अटक, तसेच ‘तमिळ थाई वाझ्थू’ या राज्याच्या प्रार्थनागीतासंदर्भातील वाद या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, कावेरी नदीवरील मेकेदातू धरण प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारकडून भूमिपूजन करण्याच्या हालचालींना विजय यांनी तीव्र विरोध दर्शविला. हा प्रकल्प कावेरी जलविवाद न्यायाधिकरणाच्या अंतिम निर्णयाविरोधात तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात असल्याचे त्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी राज्यातील सर्व शासकीय कार्यक्रमांच्या प्रारंभी ‘तमिळ थाई वाझ्थू’ हे राज्य प्रार्थनागीत गाण्याची परंपरा कायम ठेवण्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणीही विजय यांनी केली. केंद्रीय गृह मंत्रालयाने यावर्षी जानेवारीमध्ये जारी केलेल्या परिपत्रकानंतर काही कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत प्रथम सादर करण्यात येत असल्याची बाब त्यांनी मांडली.
तसेच श्रीलंकेकडून अटक करण्यात आलेल्या तमिळनाडूतील मच्छीमारांची आणि त्यांच्या नौकांची तातडीने सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी विनंतीही मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधानांकडे केली.
बैठकीदरम्यान विजय यांनी नेदरलँड दौऱ्यातून ‘अनैमंगलम कॉपर प्लेट्स’ भारतात परत आणल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
दरम्यान, मुख्यमंत्री विजय गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचीही भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, नुकत्याच झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत TVK पक्षाने २३४ पैकी १०८ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली असून, १० मे रोजी विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.





