CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता ‘क्लिक’वर! इंदापूरच्या रुग्णांसाठी उपचाराचा मार्ग झाला सुकर
CM Relief Fund: प्रवीण माने यांनी पुढाकार घेऊन लाभार्थ्यांसाठी उभारला विशेष मदत कक्ष; कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन अर्ज आणि पाठपुराव्यासाठी रुग्णांना मिळणार मोफत मार्गदर्शन.
CM Relief Fund – मुख्यमंत्री सहाय्यता निधीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन झाल्याने इंदापूर तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी उपचाराचा मार्ग अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक झाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या दारात पोहोचला आहे. इंदापूर तालुक्यात निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अनेक वर्षांपासून स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवली होती.
या माध्यमातून अनेक गंभीर रुग्णांना वेळेत आर्थिक मदत मिळून त्यांचे प्राण वाचले आहेत. आता निधीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन झाल्याने उपचारासाठी मदत मिळण्याचा कालावधी आणखी कमी होणार असून गरजूंना तातडीने दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाच्या नव्या प्रणालीमुळे अर्जाची मंजुरी कार्यालयीन वेळेत अवघ्या आठ तासांत मिळणार आहे. रुग्णालयामार्फतच अर्ज सादर होणार असल्याने मंत्रालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही.
अर्जाची स्थिती मोबाईलवर रिअल टाईममध्ये समजणार असून निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे युवक नेते तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी विशेष मदत कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कार्यालयामार्फत निधीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, रुग्णांना मार्गदर्शन आणि पाठपुरावा यासाठी विशेष सहकार्य केले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. इंदापूर तालुक्यातील कोणताही गरजू रुग्ण केवळ माहितीअभावी किंवा प्रक्रियेच्या अडचणीमुळे या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी आमचे कार्यालय सदैव तत्पर राहील. आरोग्यसेवा हीच खरी लोकसेवा असून गरजूंच्या उपचारासाठी आवश्यक ती प्रत्येक मदत करण्याची आमची बांधिलकी कायम राहील, असे प्रवीण माने यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या या डिजिटल परिवर्तनामुळे तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी वेळेत आर्थिक मदत मिळणार असून, आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमतेलाही नवे बळ मिळणार आहे. सामाजिक संवेदनशीलता, प्रशासनाची तत्परता आणि लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन यांचा संगम घडविणारा हा निर्णय पुणे जिल्ह्यासाठी आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.






